Home देशविदेश नसे भेद काही, तिथे खेद नाही…

नसे भेद काही, तिथे खेद नाही…

    भेद म्हणजे दुजाभाव, भेद म्हणजे द्वेष ईर्षा मत्सर. हे सारे दुर्गुण म्हणजेच वाईट गुण हे जिथे आहेत तिथे भेद आहे, आणि जिथे भेद आहे तिथे खेद आहे. खेद म्हणजे दुःख विरह निराशा नाराजी. 

         माणूस दुःखी का होतो ? याचे कारण म्हणजे हे दुःख स्वतःच्या चुकामुळे किंवा चुकीचे निर्णय घेतल्यामुळे सुद्धा होऊ शकते, किंवा हे दुःख दुसऱ्याने सुद्धा दिलेले असते. मोह हे दुःखाचे मूळ कारण आहे, असे बुद्ध म्हणतात.

       जेवण जगण्यापुरता स्वार्थ हा वाईट नाही परंतु अति लोभ म्हणजेच मोह ही एक वाईट गोष्ट आहे किंवा हा माणसाचा दुर्गुण आहे.सत्ता संपत्ती प्रतिष्ठा या तीन गोष्टीचा माणसाला जेव्हा लोभ होतो म्हणजेच हा होते तेव्हा तो माणूस हवि होऊन एक तर चांगल्या मार्गाने या तिन्ही गोष्टी मिळविण्याचा प्राप्त करतो आणि जर योग्य मार्गाने या गोष्टी नाही मिळाल्या तर मात्र वाईट मार्गाचा पण अवलंब करतो, खरे तर वाईट मार्गाचा अवलंब करणे म्हणजे चूक करणे आहे किंवा पाप करणे होय, अधर्म होय, तरी तो करतोच, वाईट मार्गाचा अवलंब केल्यामुळे त्याला स्वतःला तर त्रास होतोच परंतु इतरांना दुःख होते, तरी मात्र तो याचा विचार करीत नाही कारण त्याची लोभी बुद्धी किंवा प्रवृत्ती.

        या प्रवृत्तीला भेदी प्रवृत्ती किंवा भेदिक विचार असे पण म्हणतात, भेदी विचार याचा अर्थ भेदभावाचे विचार, भेद करणारे विचार, तडा जाणारी विचार, विषमतेचे विचार, म्हणजेच भेद होय. आणि जिथे भेद आहे म्हणजेच ज्याच्या डोक्यात भेद आहे तो भेदभावाचे वातावरण तयार करतो, त्यातून भेदयुक्त परिस्थिती निर्माण होते, आणि या भेदयुक्त परिस्थितीतूनच भेदयुक्त व्यवस्था निर्माण होते, म्हणजेच विषमतेची व्यवस्था, आणि अशा या विषमतेच्या व्यवस्थेचे अनेक दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतात.

      अशा प्रवृत्तीच्या किंवा अशा विचाराच्या लोकांमुळेच विषमतेची ही व्यवस्था निर्माण झालेली आहे. स्वार्थी लोकांच्या डोक्यात भेद असतो याचा अर्थ त्यांचे डोकेच भेदलेले असते म्हणून ते समाजात पण भेदभाव निर्माण करतात आणि भेदभावाची वागणूक इतरांना देतात, अशा माणसांना दुष्ट किंवा दुर्गुणी माणसे म्हणतात. असे दुष्ट दुर्गुणी लोक सज्जनांचा त्रास होऊन बसतात. सज्जन लोकांना यांचे सोबत राहणे जीवन कंठणे कठीण होऊन जाते. सहजीवनाचे अस्तित्व धोक्यात येते. असे हे भेद बुद्धीचे दुष्परिणाम आहेत.

        केवळ स्वतःच्या स्वार्थापायी सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठेचा मोह करायचा आणि त्यातून विषमतावादी व्यवस्था निर्माण करायची की ज्यामुळे सर्व समाज दुखी होईल हे अगदी चुकीचे आहे. ही चूक करायची नसेल तर म्हणजेच समतेचे वातावरण किंवा परिस्थिती किंवा समतेची व्यवस्था निर्माण करायचे असेल तर हा भेदभाव किंवा भेद बुद्धी बाळगणे सोडले पाहिजे, आणि समतेचे विचार स्वीकारले पाहिजेत, तरच भेद बुद्धी संपेल आणि भेद पण संपेल, यामुळे जिथे भेद नाही तिथे खेद नाही म्हणजेच दुःख नाही, त्रास नाही. म्हणजेच तिथे आनंद आणि सुख आहे. आनंदाचा ठेवा आहे. 

         माणूस मग तो गरीब असो की श्रीमंत, या जातीचा सुखी त्या जातीचा, लहान असो की मोठा, सुबुद्ध असो की कमी बुद्धीचा, तो कसाही असला तरी, ज्या कुटुंबात, ज्या समाजात, ज्या देशात भेद आहे, तेथे खेद असणारच, आणि जिथे भेद नाही म्हणजेच भेदभावाचे विचार किंवा भेदभावाच्या भावना नाहीत तिथे खेद कसा असणार?

      जे स्वार्थी लोक भेदभावाचे वातावरण निर्माण करतात किंवा परिस्थिती निर्माण करतात म्हणजेच व्यवस्था निर्माण करतात आणि अशा या व्यवस्थेचे बळी सारेच होत असतात, अशा व्यवस्थेचे बळी स्वतः स्वार्थी लोक पण असतातच, कारण विषमतेच्या या व्यवस्थेत हे स्वार्थी लोक सुद्धा सुखी समाधानी आनंदी शांततामय जीवन जगू शकत नाहीत, हे त्यांना माहीत असूनही, भेदच करीत राहतात, याचा अर्थ हे पण या व्यवस्थेचे गुलामच आहेत, असेच म्हणावे लागते. विषमतेच्या व्यवस्थेने मुठभर लोकांना श्रीमंत केले, त्यांना भौतिक सुख दिले आणि आम जनतेस मात्र दुःखात आणि त्रासाच्या खाईत लोटले. 

       ज्यांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य अशा प्राथमिक गरजांचा सुद्धा त्या पूर्ण न होऊ शकल्यामुळे त्रास होतो, अशी बहुसंख्य जनता या विषमतावादी व्यवस्थे चे बळी असते, पण त्याची जाणीव त्यांना नसते, कारण आपण जे दुःख भोगीत आहोत ते या स्वार्थी बुद्धीच्या मोह जडलेल्या भेद बुद्धीच्या लोकांमुळे नसून देवाची अवकृपा किंवा मागील जन्माचे वाईट कर्म म्हणजेच आपले भाग्य दुर्भाग्य आणि कर्म याला दोष देतात म्हणजेच आपण ज्या त्रासात जीवन जगत आहोत त्याचे कारण म्हणजे देव आणि दैव आहे असे त्रास होऊ नये लोक गृहीत धरून चालत असतात की जे चुकीचे विचार आहेत किंवा ज्या अंधश्रद्धा आहेत या वाटेने हे लोक जात आहेत म्हणूनच दुःखातही आनंद मानण्याची प्रवृत्ती किंवा ठेविले अनंते तैसेचि रहावे, या धार्मिक शिकवणुकीमुळे लोक शांत राहत असतात, नव्हे त्रास सहन करीत आपले जीवन व्यतीत त करीत असतात.

        आणि काही लोकांच्या भेद बुद्धीमुळे निर्माण झालेल्या या व्यवस्थेमुळे आपण त्रास भोगत आहोत हे जेव्हा त्यांना कळेल, त्यांना जाणवेल, म्हणजेच ही जाणीव जागृती होईल, तेव्हाच ही दुःखद त्रासदायक परिस्थिती बदले ल. आणि विषमतावादी व्यवस्था नष्ट होऊन त्या ठिकाणी जेव्हा समतावादी व्यवस्था येईल तेव्हा मात्र भेद बुद्धीला सुद्धा संधी भेद करण्याची संधी मिळणार नाही. कारण वाईट वातावरणामध्ये माणसाच्या वाईट बुद्धीला खतपाणी मिळत असते, चांगल्या वातावरणामध्ये वाईट बुद्धीची रुजवन होणे शक्य नाही, किंवा अवघड असते.

         म्हणून भेद आणि भेदभाव नसलेले वातावरण असणे जरुरीचे आहे की ज्यामुळे जिथे भेदच नाही तिथे खेदच नाही. याचा अर्थ जिथे भेद आहे तिथे खेद आहे, आणि जिथे भेद नाही तिथे खेद नाही, म्हणजेच दुःख आणि त्रास नाही, भेदभावाच्या वातावरणात ना गरीब सुखी आहे ना श्रीमंतही, सर्वच दुःखी आहेत. 

     लेखक : दत्ता तुमवाड

      सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक: 4 सप्टेंबर 2025. फोन: 9420912209.