लेखक डॉ.शां.ग.महाजन यांना ‘ज्ञानसंवर्धन पुरस्कार’ प्रदान… — पुणे विद्यार्थी गृहातर्फे दोन दिवसीय ‘ज्ञानस्रोत’चा समारोप…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

        पुणे : ‘ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाल्यानंतर ज्ञानदानाचे कार्य हाती घेतलेल्या डॉ.शां.ग.महाजन यांनी अनेक ग्रंथपाल घडवले. समृद्ध साहित्याची निर्मिती व आधुनिकतेची कास धरत ९२ व्या वर्षातही ज्ञानदानाचा दीप तेवत ठेवण्याचे महाजन यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांनी आजवर केलेल्या ८९ ग्रंथ व पुस्तकांची निर्मिती नव्या पिढीसाठी आदर्श आहे,’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले. चित्रकलेतून वाचन, भावसंस्कृती व्यक्त करता येते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

          पुणे विद्यार्थी गृह आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विनायक माढेकर यांच्या पुढाकारातून आयोजित ‘पँटेथलॉन २०२३’ या सलग २४ तास पेंटींग उपक्रमाँचे लोकार्पण व ज्ञानसंवर्धन पुरस्कार वितरण कार्यक्रमात डॉ.गोसावी बोलत होते. प्रसंगी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुधीर आगाशे, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, कार्यवाह प्रा.राजेंद्र कांबळे, संचालक प्रा.राजेंद्र कडुस्कर, कुलसचिव अमोल जोशी, चित्रकार विनायक माढेकर, हाऊस ऑफ सक्सेसचे प्रसाद मिरासदार, भुवनेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

         जयकर ग्रंथालयामध्ये व ग्रंथालय शास्त्रावर आधारित पुस्तकांचे लेखन करून महाराष्ट्रातील ग्रंथालयांना सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यामध्ये भरीव योगदान देणाऱ्या डॉ.शां.ग.महाजन यांना ज्ञानसंवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोरोना काळात आरोग्य सेवा पुरवणाऱ्या डॉ.वैभव देवगिरीकर यांचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

         सुनील रेडेकर म्हणाले, ‘सलग २४ तास पेंटिंगचा उपक्रम संस्थेच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी व जीके पाटे व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात झाला. संस्थेच्या शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह अन्य संस्थाही यामध्ये सहभागी झाल्या. यासह ई-कचरा संकलन व ब्लेडस ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियममधील वस्तूंचे प्रदर्शन येथे भरविण्यात आले होते.’

          डॉ.अरविंद शाळीग्राम म्हणाले, ‘ज्ञानस्रोत्र ही नवीन संकल्पना नाही. ज्ञानाचे देवाणघेवाण होणे म्हणजे ज्ञानस्रोत्र आहे. आपण नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान घेत रहावे. हे ज्ञान समाजाच्या कल्याण्यासाठी वापरावे. आज ग्रंथाच्या पलीकडे आपल्याला गुरु भेटत आहेत. विविध माध्यमांच्या स्वरूपात ज्ञानाची दालने उघडली गेली आहेत. ज्ञानाचा उपयोग केवळ पदवी मिळवण्यासाठी करू नये.

ज्ञानसंवर्धन केल्याचे चीज झाले 

           ‘आजच्या पुरस्काराने कृतार्थ झालो आहे. आजवर केलेल्या ज्ञानसंवर्धनाचे चीज झाल्याची भावना आहे. पुणे विद्यार्थी गृह आणि माझा ४५ वर्षांपासूनचा संबंध आहे. माझ्या पहिल्या पुस्तकांचे प्रकाशन, नाशिकमधील ग्रंथपालांना मार्गदर्शन याची सुरुवात इथूनच झाली. पुढे ग्रंथालय शास्त्राची पुस्तक लिहिण्याचा व विकण्याचा उद्योग सुरु झाला. आजपर्यंत पुणे विद्यार्थी गृहने माझी २२ पुस्तक प्रकाशित केली आहेत. माझा वाढदिवस मी पुस्तक प्रकाशित करून साजरा करतो. पुणे शहराशी निगडित आतापर्यंत १४ ग्रंथ लिहिले आहेत. एमफिल, पीएचडी याविषयी मार्गदर्शक, डॉ. अब्दुल कलाम, द्रौपदी मुर्मू, डॉ. रंगनाथन यांची चरित्रे लिहिली,’ अशी भावना डॉ. शां. ग. महाजन यांनी व्यक्त केली.

         सूत्रसंचालन प्रा.डॉ मीनाक्षी अत्रे यांनी केले. प्रा.राजेंद्र कांबळे यांनी आभार मानले.