भागवत धर्माची पताका उंचावण्याचे काम पत्रकारांनी केले : भैय्यासाहेब रवींद्र पाटील… — “भागवत धर्म प्रचारक” पुरस्कार सासवडचे पत्रकार मनोज मांढरे यांना प्रदान..

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

पंढरपूर : भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेव महाराजांनी काम केले. त्यांचे कार्य पुढे नेण्याचे व भागवत धर्माची पताका उंचावण्याचे काम वारीच्या माध्यमातून पत्रकारांनी केले आहे. अशा पत्रकारांचा सन्मान करण्याची संधी मुक्ताई संस्थानला प्राप्त झाली आहे असे मत संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

       संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगरच्या वतीने कै.प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ सन २०१९ पासून पत्रकारिता क्षेत्रात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या पत्रकारांना ” भागवत धर्म प्रचारक ” हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यापूर्वी हा पुरस्कार सूर्यकांत भिसे (वेळापूर ) व शंकर टेमघरे ( पुणे ) यांना देण्यात आला असल्याचे हभप रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितले.यंदाचा पुरस्कार पुणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोज मांढरे (सासवड) यांना देण्यात आला. वारकरी फेटा, उपरणे, श्रीफळ व श्री विठ्ठलाची मूर्ती असे या पुरस्काराचे स्वरुप असल्याचे हरणे महाराज यांनी सांगितले. 

        या पुरस्कार वितरण सोहळ्यास संस्थानचे विश्वस्त गजानन पाटील, पंजाबराव पाटील, कन्हैया महाराज, भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड विलास काटे,‌ कवी दशरथ यादव, राजेंद्रकृष्ण कापसे आदी उपस्थित होते .

         मांढरे म्हणाले, १९९३ पासून प्रेसफोटोग्राफर म्हणून वृत्तपत्र क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. वारीचे फोटो वृत्तपत्रांत प्रसिध्द होत राहिले. त्यामुळे आवड निर्माण झाली व त्यातून भागवत धर्माचा प्रचार प्रसार होत गेला. संत नामदेव महाराज घुमान सायकल यात्रेने त्यावर कळस चढविला.