पुणे जिल्हा नियोजन (डीपीडीसी) उपसमितीच्या अध्यक्षपदी शरद बुट्टे पाटील यांची निवड….

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

पुणे : जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) चे अध्यक्ष आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खेडचे भाजपचे नेते शरद बुट्टे पाटील यांना डीपीडीसीच्या उपसमितीचे अध्यक्ष हे महत्वाचे पद देत त्यांच्यावर मोठा विश्वास आणि जबाबदारी टाकली आहे. शरद बुट्टे पाटील हे पुणे जिल्हा परिषदेचे भाजपचे गटनेते व अभ्यासू सदस्य म्हणून काम केले आहे. भाजप पक्षानं त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली असून यामुळे बुट्टे पाटील यांचं जिल्ह्यात राजकीय वजन वाढणार आहे.

          पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डीपीडीसीच्या उपसमिती स्थापन करण्याची व तिचे अध्यक्षपद शरद बुट्टे पाटील यांना देण्याची शिफारस डीपीडीसीचे सचिव तथा पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानुसार नुकतीच पाच सदस्यीय उपसमिती नुकतीच गठीत करण्यात आली.त्यात डीपीडीसीवर संधी न मिळालेले भाजपच्या चार पदाधिकाऱ्यांची सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.

          पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, हवेली भाजपचे अध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे, इंदापूरचे तानाजी शिंगाडे, हिंजवडीच्या भारती विनोदे अशी त्यांची नावे आहेत. तर, खेडचे बुट्टे हे या उपसमितीचे अध्यक्ष आहेत. अशाप्रकारे जिल्ह्याच्या सर्व भागाला त्यात प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

          जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यामध्ये ज्या कामांना निधी उपलब्ध होतो त्यांना वेळेत मान्यता आणि ई-निविदा होऊन ती कामे वेळेत पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे,अशी माहिती शरद बुट्टे पाटील यांनी दिली. गेली २० वर्षे जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामाचा अनुभव असल्याने पालकमंत्र्यांनी आपल्यावर टाकलेला हा मोठा विश्वास कृतीतून सार्थ करून दाखवू असे ते म्हणाले.

       डीपीडीसीने मंजूर केलेल्या कामांना गती मिळावी यासाठी ही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातून मोठा निधी जिल्हा परिषदेच्या विविध भागांकडे येऊन ग्रामीण भागामध्ये अतिशय गरजेची विकास कामे होत असतात. ती वेळेत आणि गुणवत्तेने व्हावी हा ही समिती गठीत करण्यामागील हेतू व प्रयत्न आहे.