चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा… — उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

            चंद्रपूर जिल्ह्यात 20 दिवसानंतर शुक्रवारी मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस बरसला. अशातच अनेक नदी नाल्यांना पूर आला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर अनेकांच्या शेतात पाणी जमा झाले असून धान, सोयाबीन, कापूस, भाजीपाला पीक संपूर्ण पाण्याखाली गेले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई द्यावी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे केली आहे.

                चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, चिमूर, मूल, बल्लारपूर पोंभुरणा, गोंडपीपरी यासह इतर तालुक्यात मागील तीन दिवस मुसळधार पाऊस बरसला. परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे व पुराचे पाणी जमा झाले, तर अनेक शेतकऱ्यांचे शेतपिके पाण्याखाली गेले असून प्रचंड नुकसान झाले आहे. महागडे औषध फवारणी तसेच मजुरी सुद्धा वाया गेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, त्यामुळं नुकसानग्रस्त शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई करावी, तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.