माजी महापौर महादेव देवळे यांची वयाच्या ८० व्या वर्षात ‘कोरोना’वर मात !

0
276

 

पंडित मोहिते-पाटील
उपसंपादक
‘दखल न्युज भारत’

मुंबई, दि.२७ : मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधून सोडण्यात आले. तेव्हा त्यांच्यासोबत कुटुंबीयांसाठीही हा आनंदाचा क्षण होता. मुंबई‘कोविड-१९ ’चे निदान झाल्यानंतर, देवळे यांच्यावर उपचार सुरू असताना वयोमानामुळे व अनेक अवयवांमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याने आव्हाने उभी राहिली होती. डॉक्टरांच्या अथक परिश्रमांमुळे देवळे यांच्यावरील संकट टळले व ते बरे झाले. अतिदक्षता विभागामध्ये प्रवेश केल्यापासून बरे होईपर्यंतच्या त्यांच्या रुग्णालयातील २० दिवसांच्या मुक्कामात त्यांच्यावर विविध उपचार करण्यात आले.

जुलैच्या मध्यातच देवळे (वय ८० वर्षे) यांना थोडा खोकला आणि उच्च रक्तदाब या त्रासांवरील उपचारांसाठी ‘केडीएएच’मध्ये आणण्यात आले. त्यांना हलका ताप आणि श्वास घेण्यात अडचण येत असल्याचे तपासणीत आढळले. त्यांच्या ऑक्सिजनची पातळी तपासली गेली, ती अतिशय कमी होती. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. आणखी चाचण्या झाल्यावर त्यांना तीव्र स्वरुपाचा न्यूमोनिया झाल्याचे, तसेच ‘कोविड-१९’ची लागण झाल्याचेही निदान झाले. त्यांची प्रकृती अधिकच खालावली व त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले.

‘कोविड-१९’ हा प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करणारा श्वसनाचा रोग आहे. ताप, कोरडा खोकला, थकवा आणि स्नायू दुखणे ही याची सामान्य लक्षणे आहेत, तथापि हृदय, मेंदू, मुत्रपिंड आणि पचनसंस्था यांसह शरीराच्या इतर अवयवांच्या यंत्रणेवरदेखील या रोगाचे परिणाम होऊ शकतात. केडीएएच येथे ‘कोविड-१९’ची लागण झालेल्या गंभीर अवस्थेतील ३५० रूग्णांचा अभ्यास केला असता असे दिसून आले आहे, की त्यातील सुमारे २० टक्के जणांना न्यूरोलॉजिकल समस्या आहेत आणि त्यापैकी ४० टक्के रुग्णांच्या न्यूरोलॉजिकल समस्या गंभीर झालेल्या आहेत. विशेषत: ज्यांना न्यूमोनिया झाला, त्यांच्याबाबत हे आढळून आले, तसेच २० टक्के जण स्ट्रोक्समुळे ग्रस्त आहेत. काहींना सीझर्स आले व ते कोमातही गेले. मधुमेह नसलेल्या रुग्णांमध्येही रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करणारे हार्मोनल असंतुलन आढळून आले, तसेच थायरॉईडच्या हार्मोन्सचे प्रमाण बदलले. यातील काही रुग्णांना तीव्र स्वरुपाचा, नियंत्रित न होणारा, जीवघेणा ठरू शकणारा ताप आला.

यापूर्वी कर्करोगातून वाचलेल्या आणि सध्या उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या महादेव देवळे यांचा जणू पुनर्जन्मच झाला आहे. सतत झोप येणे, सुस्तपणा येणे व मानसिक संभ्रम वाटणे ही प्राथमिक लक्षणे असलेल्या देवळे यांना प्रत्यक्षात ‘कोविड-१९’ची लागण होऊन त्यात गुंतागुंत निर्माण झाली होती. त्याचा परिणाम त्यांची फुफ्फुसे, मेंदू व हृदय व इतर अवयवांवर झाला होता. देवळे यांच्यावर ‘कोविड-१९’चे विविध स्वरुपाचे, तसेच स्ट्रोक, हृदयविकार यांचे उपचार करून ‘न्यूरो-रिहॅबिलिटेशन’ केल्याने त्यांच्या प्रकृतीत यशस्वी सुधारणा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.