टाटा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या नव्या संशोधनामुळे स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सरच्या) उपचाराचा कालावधी व खर्च कमी होणार

0
990

 

पंडित मोहिते-पाटील
उपसंपादक
‘दखल न्यूज भारत’

मुंबई, दि.२७ : आपल्या देशातील कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांची संख्य दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यावरील उपचार आणि औषधांवर होणार खर्च हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नसतो. पण यावर उपचारासाठी सर्वसामान्य नागरिक टाटा मेमोरियल हॉस्पिटलकडे धाव घेतात. आता या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या नव्या संशोधनामुळे रुग्णांवरील उपचाराच्या कालावधीत आणि खर्चात प्रचंड बचत होणार आहे.

स्तनाचा कर्करोगाच्या (ब्रेस्ट कॅन्सरच्या) एका प्रकारावर संशोधन करुन त्यावरील उपचाराचा कालावधी आणि खर्च अर्ध्याहून कमी होईल, असे संशोधन टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केले आहे. अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे जर्नल असलेल्या जामा नेटवर्क ओपनमध्ये मंगळवारी (२५ ऑगस्ट) त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या नवीन संशोधनामुळे एक वर्षासाठी जे उपचार घ्यावे लागत होते, ते उपचार आता केवळ तीन ते सहा महिने जरी केले तरी त्याचा तेवढाच परिणाम होतो, असे या संशोधनातून समोर आल्यामुळे या उपचारासाठी लागणाऱ्या पाच ते सहा लाख रुपयांच्या खर्चाऐवजी आता केवळ एक ते दोन लाख रुपये खर्च औषधांवर करावा लागणार आहे. तसेच एक वर्ष हे उपचार घेतल्याने जे साईड इफेक्ट होतात, ते देखील कमी होऊन स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) असलेल्या रुग्णाला कमी त्रास होणार आहे.

टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन टाटा मेमोरिअल सेंटरचे डायरेक्टर डॉ.राजेंद्र बडवे आणि टाटा हॉस्पिटलचा भाग असलेल्या खारघर येथील अक्ट्रेकचे डायरेक्टर डॉ.सुदीप गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. दीड ते दोन वर्षांचा कालावधी त्यासाठी लागला असून १२ हजार स्तनाचा कर्करोगाच्या (ब्रेस्ट कॅन्सरच्या) रुग्णांचा अभ्यास यादरम्यान करण्यात आला आहे.

स्तनाचा कर्करोगाच्या (ब्रेस्ट कॅन्सरच्या) अनेक प्रकारांपैकी एचईआर२-पाॅझिटिव्ह (HER2-Positive) कॅन्सर एक प्रकार आहे. Trastuzumab हे औषध या रुग्णांना १२ महिने द्यावे लागते. ४ ते ५ लाखांच्या घरात त्याचा खर्च असतो. हीच उपचारपद्धती गेल्या १५ वर्षांपासून सर्वत्र अवलंबिली जात आहे. हृदयाचे आजार देखील या औषधामुळे होण्याची शक्यता असते. पण आम्ही केलेल्या संशोधनात, ३ ते ६ महिने जरी हे औषध दिले तरी त्याचा परिणाम दिसून येतो, असे आढळल्यामुळे रुग्णांना कमी कालावधी आणि १ ते २ लाख रुपये खर्च येणार असल्याचे डॉ.सुदीप गुप्ता म्हणाले.

भारतात दरवर्षी नवीन आढळणाऱ्या दीड ते पावणेदोन लाख स्तनाचा कर्करोगाच्या (ब्रेस्ट कॅन्सरच्या) रुग्णांपैकी अंदाजे ४५ हजार रुग्णांना या संशोधनाचा फायदा होईल, असेही डॉ.गुप्ता म्हणाले. हे संशोधन प्रसिद्ध झाल्यापासून जगभरातून टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या या टीमला प्रतिक्रिया येत आहेत. केवळ भारतात नाही तर जगभरात असलेल्या स्तनाचा कर्करोगाच्या (ब्रेस्ट कॅन्सरच्या) रुग्णांना या नवीन संसोधनामुळे फायदा होणार आहे.