ईवळेश्वर ते शिऊर रस्ता पाच महिन्यातच उखडला, गोर सेनेने केली चौकशीची मागणी !

0
190

 

माहूर(प्रतिनिधी पवन कोंडे )

 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने 76 लक्ष रूपये खर्च करून मार्च महीन्यात केलेल्या ईवळेश्वर ते शिऊर रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाच महिन्यातच तो रोड खराब झाला आहे.सदर कामाची गुणनियंत्रण विभागा कडून चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी निवेदन गोर सेना तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव यांनी उपविभागीय अभियंता माहूर यांना दि.24 ऑगस्ट दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
माहूर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या नागरिकांना जगाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सार्वजनिक
बांधकाम विभागाने 74 लक्ष रुपये खर्च करून इवळेश्वर ते शिऊर या रस्त्याचे डांबरीकारण व मजबुतीकरणाचे काम मार्च महीन्यात पूर्ण केले होते.सदरील रस्त्यावरून कुठल्याही जड वाहनांची रहदारी नसतांना तसेच सामान्य वाहनांची तुरळक वर्दळ असतानाही अवघ्या पाच महिन्यातच अनेक ठिकाणी मोठमोठी खड्डे पडले आहेत. आजमितिस त्या रोडवरून ये-जा करण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचा उल्लेख जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत केला असून त्याची प्रत कार्यकारी अभियंता भोकर यांनाही देण्यात आली आहे.
पूर्वी हा रोड अतीशय ख़राब होता. आता थोडा ख़राब आहे.या रोडचे काम खान कन्स्ट्रक्शन वाई बाजार यांनी केले आहे , काम चांगलेच झाल्याची माहिती उपअभियंता वसंत झरीकर यांनी दिली.