जुने बंद पडलेले हायमास्ट दुरुस्त केल्याशिवाय नवीन मंजूर हायमास्ट लाऊ देणार नाही….नगरसेवक मिलींद खोब्रागडे

0
162

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

आरमोरी शहरात नगरपंचायत असतांनाच मुख्य शहरातील काही ठिकाणी हायमास्ट लावण्यात आले त्यामुळे आरमोरी शहर हे प्रकाशमाय होवून उजळेल असे वाटले होते. परंतु अल्पावधीतच हे हाय मास्ट हळूहळू बंद होत गेले. आणि शहरातील जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त हायमास्ट लाईट बंद पडली आहेत. यासंबंधी वारंवार प्रशासनाला सूचना करूनही त्याकडे कानाडोळा केल्या जात आहे. जुने लाईट दुरुस्त करून लावायची असतांना संबंधित कंत्राटदाराचे बिल काढून कंत्राटदार मोकळे झाले मात्र आता त्यांना दुरुस्त न करता नव्याने पुन्हा हाय मास्ट चे नियोजन करण्यात आले आहे. आणि त्याचे काम सुरू झालेले असल्याने जुन्या हायमास्टचा यांना विसर पडला आहे. जुने हायमास्ट दुरुस्त न करता नवीन कामे घेतांना पहिल्यांदा जुन्या कामाचे संगोपन करणे गरजेचे आहे. नंतरच नवीन कामाला प्राधान्य द्यावे. नव्याने झालेल्या नगरपरिषदेच्या माध्यमातून आरमोरीचा विकास योग्य नियोजन आणि विचारवंत लोकांच्या सल्ला सोबतच सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन करावा.

आरमोरी शहरातील चौकाचौकातील हायमास्ट बंद पडल्याने सर्वत्र अंधार पडला असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी खूप काळोख अंधार पडत असल्याने या पावसाळ्याच्या दिवसात सरपटणारे प्राणी, कीटक आणि पिसाळलेल्या कुत्र्यांपासून स्वतःचे रक्षण करणे कठीण झाले आहे. त्याचप्रमाणे अशा अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांची सुद्धा भीती वाटायला लागली आहे. रस्त्याने जा-ये करणाऱ्या वाहनाचा सुधा समतोल बिघडत असल्याचे दिसुन येत आहे. तर बऱ्याचदा या अंधाराचा फायदा घेऊन दारू तस्कर आपल्या मालाची विल्हेवाट लावत असतील याचीही शंका मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे. त्यामुळे जोपर्यंत जुने हायमास्ट दुरुस्त करून लावण्यात येत नाही तो पर्यंत नवीन लावू देणार नाही. अशी सूचना आणि खबरदारी नगर सेवक मिलींद खोब्रागडे यांनी मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे दिली आहे.