आदिवासी मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण: अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल; अटक केव्हा होणार?

495

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

कोरची,ता.२४: येथील घरकाम करणाऱ्या एका गरीब आदिवासी अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या अज्ञात आरोपीवर पोलिसांनी पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आता या आरोपीचा शोध घेत आहेत.
‘अल्पवयीन आदिवासी मुलीवर मातृत्व लादणारा बाप कोण?’ पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादंवि ३७६ (२)(जे ) सह पोस्को कायद्याच्या कलम ४ अन्वये कोरची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अज्ञात आरोपीकडून पीडित अल्पवयीन मुलीवर आणि तिच्या आई-वडिलांवर प्रचंड दबाव आणला होता. मात्र, माध्यमांनी हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर शासनाच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांनी फिर्याद नोंदविली. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कोंडूभैरी प्रकरणाचा तपास करीत आहेत.
आरोपी हा एका राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्याचा जवळचा नातेवाईक असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे पोलिस त्याला गजाआड करतात की दबावात प्रकरणावर पडदा टाकतात, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आरोपीला अटक झाली नाही, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी कंवर समाजाने दिला आहे.
मागील मार्च महिन्यात कोरचीत अशाच एका आदिवासी मुलीवर ग्रामसेवकाने बलात्कार केल्याची घटना घडली होती. मुलीची आई आणि मुलीने पोलिसांत तक्रारसुद्धा दिली होती. परंतु चिरीमिरी घेऊन हे प्रकरण मिटविण्यात आल्याची त्यावेळी चर्चा होती. असाच प्रकार आता होऊ नये, एवढी अपेक्षा जनता व्यक्त करीत असल्याचे कळते.