माहूर तहसीलदारांना खंडणी मागणारे मनसेचे पदाधिकारी गजाआड

271

 

माहूर (प्रतिनिधी पवन कोंडे )

माहूर तालुक्यातून वाहणा-या पैनगंगा नदी पात्रातून अवैध रीत्या रेतीचा उपसा करून चढ्या दराने विक्री केल्याने शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविल्या प्रकरणी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांची चौकशी करून त्यांना शासकीय सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करा. या मागणीसाठी मनसेचे किनवट तालुकाध्यक्ष नितीन मोहरे व माहूर तालुकाध्यक्ष गजानन कुळकर्णी यांनी दि.14 ऑगस्ट 2020 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे आमरण उपोषण आयोजित केले होते.मात्र प्रशासनिक कारणास्तव त्यांना उपोषणाला बसता आले नाही.सदर प्रकरणी तक्रार मागे घेणे व वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित न करण्यासाठी दोन्ही पदाधिका-यांनी आपल्या संवगड्याच्या सहकार्याने तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांना खंडणी ची मागणी केली होती. ती बाब तहसीलदारांनी जिल्हाधिकारी महोदयांना कळविली.त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही गंभीर बाब जिल्हा पोलीस अधीक्षकांना कळविण्यात आली.त्यांनी केलेल्या सूचनेनुसार दि.21 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे लावलेल्या सापळ्यात मनसे पदाधिका-यांचा एक सहकारी अलगत अडकला.त्यानंतर तहसीलदारांच्या तक्रारी नुसार नितीन गणेश मोहरे राहणार किनवट,गजानन प्रभाकर कुळकर्णी माहूर,दुर्गादास राठोड,अंकुश भालेराव किनवट,कामारकर व राजकुमार नारायण स्वामी यांना स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेवून वजीराबाद पोलीस स्टेशनला गु.र.नं.400/2020 कलम 384,34 भा.द.वि.नुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास स.पो.नि. सुनील नाईक हे करीत आहेत.
या संदर्भात तहसीलदार सिद्धेश्वर सुरेश वरणगांवकर यांनी दि.22 ऑगस्ट रोजी दु.3 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोपीनी माझे विरुध्द केलेले सर्व आरोप बिनबुडाचे होते व धादांत खोटे असल्याची बाब तत्का. सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या चौकशीत निष्पन्न झाली होती.मी तालुका दंडाधिकारी असतानाही त्यांनी मला अज्ञातस्थळी बोलावले तिथे अंकुश भालेराव या आरोपीने माझ्या गाडीची तपासणी केली,आणि आमच्या गाडीच्या मागे या असा हूकूम फर्मावला.त्यानुसार मी त्यांच्या गाडी मागे रेणुका गडाच्या पायथ्याशी पोहचलो.तिथे त्यांनी माझ्या कडे पैशाची मागणी केली.सदर घटना ही उत्तर प्रदेश किंवा बिहारलाही लाजविणारी असल्याचे मत व्यक्त करून या प्रकरणातील आरोपी गजानन कुळकर्णी यांचा माहूर मधील कर्ता करविता धनी कोण ? असा प्रश्न उपस्थित करून पोलीस प्रशासनाने त्याचा शोध घेणे नितांत गरजेचे आहे. जेणे करून या तालुक्यात प्रशासनाला काम करणे सोयीचे होईल अशी अपेक्षा वरणगांवकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
किनवट मनसेचे शहराध्यक्ष सुनील ईरावार यांनी त्याच कालावधीत आत्महत्या केल्याने या प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का ?याचाही शोध पोलीसांना घ्यावा लागणार हे मात्र निश्चित.