गणरायाचे अकोट नगरीत उत्साहात स्वागत

139

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

गेल्या पाच माहिन्याहून अधिक काळ संपूर्ण राज्यभर टाळेबंदी असल्यामुळे सण,उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्याच्या प्रशासनाने सूचना दिल्या आहेत, त्यामुळे आज आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी अकोट शहरातील नागरिकांनी ढोल ताश्यांचा गजर न करता अत्यंत साध्या पद्धतीने श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली,
सकाळच्या सत्रात घरगुती गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी शहरातील कबूतरी मैदान, सोनू चौक, यात्रा चौक भागात गणेश भक्तांची झुंबड उडाली होती. पूजेचे साहित्य आणि गणेशमूर्तीसह मोरयाचा गजर गल्लोगल्ली होता. शहरातील कबुतरी मैदान येथे विविध गणपती मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत्या. सकाळच्या वेळी एवढी गर्दी होती, की पोलिसांनी शिवाजी चौक येथून हा भाग जड वाहनांसाठी बंद ठेवला होता.आज दुपारपर्यंत हा भाग गर्दीने फुलला होता. पूजेसाठी लागणारी हरळी आणि मिठाई घेण्यासाठी मोठी गर्दी होती. वेगवेगळ्या आकारांतील आकर्षक मूर्ती घरी नेण्यासाठी बचेकंपनीसह महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या वर्षी मूर्तीच्या दारात मोठी वाढ दिसून आली. पन्नास रुपयांपासून ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतच्या गणेश मूर्ती उपलब्ध होत्या.
गणपती समोर आरास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध होते. दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात कार्यकर्ते आपापल्या गावाकडे गणरायांना वाहनातून घेऊन जात होते. कोरोना संकट समोर असतानाही गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. तालुकाभर विविध मंडळांनी गणरायाची स्थापना केली. यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त गर्दी ठिकाणी तैनात करण्यात आला होता.

प्रशासनाच्या आदेशाचे पालन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा स्थापनेच्या वेळेस मिरवणूक, ढोल ताशे, गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच सोशल डिस्टनसिंग, मस्कचा वापर करावा अशा सूचना दिल्या होत्या. या सूचनांचे गणेश भक्तांनी अगदी काटेकोरपणे पालन करून कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता आपल्या लाडक्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली.