गडचिरोली जिल्हयात सक्रिय कोरोना बाधित 100 च्या आत, उरले 99 आज 34 कोरोनामुक्त तर नवीन 17 बाधित

0
152

 

कार्यकारी संपादिका रोशनी बैस

गडचिरोली (जिमाक) : जिल्हयातील सर्व बाधित 539 जवान कोरोनामुक्त झाले असून जिल्हयातील सद्या सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 99 झाली. एकुण 889 कोरोना बाधितांपैकी एसआरपीएफ, सीआरपीएफ व जिल्हा पोलीस मिळून 539 जण कोरोना बाधित झाले होते. त्यापैकी सर्वजण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील बाधितांची आकडेवारी 100च्या आत आली. जिल्हयातील सामान्य नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामूळे जिल्हयात कोरोना संसर्ग आटोक्यात येत आहे. याही पुढे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. जिल्हयात बाहेरून मोठया संख्येने नागरिक येत आहेत. त्यांना स्थानिक लोकांपासून काही काळ विलग राहणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासन त्यांना त्यांच्याच घरात घरातील नातेवाइकांजवळ विलगीकरणात राहण्यासाठी सूचना देत आहे. कोणालाही कोणत्याही कामासाठी प्रवास करण्यासाठी प्रशासन आडवत नाही. नागरिकांनी विहित पद्धतीने प्रशासनाला सहकार्य करून प्रवास करावा व आपली माहिती प्रशासनाजवळ द्यावी. जिल्हयात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होवू न देणे हे प्रशासनाचे प्रथम प्राधान्य असेल असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी म्हटले आहे. येत्या काळात म्हणजे सप्टेंबर पर्यंत आपल्या सर्वांना संसर्ग जास्त पसरू न देणे यासाठी काम करायचे आहे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

*जिल्हयात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.75 टक्के* : गडचिरोली जिल्हयात कोरोना बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.75 टक्के आहे. एकूण बाधित 889 रूग्णांपैकी 789 रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सद्या 99 रूग्णांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तर एकाचा दुर्दैवी मृत्यू जिल्हयाबाहेर झाला आहे. उर्वरीत रूग्णही लवकरच बरे होतील असे प्रशासनला आरोग्य विभागाने कळविले आहे. उर्वरीत रूग्णही लक्षणविरहित आहेत. चार ते पाच रूग्णांना साधारण लक्षणे आढळयाचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

*आज 34 कोरोनामुक्त तर नवीन 17 बाधित* : आज एकूण बाधितांपैकी 34 रूग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे सक्रिय कोरोनाबाधितांची आकडेवारी 99 झाली. कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये गडचिरोली 1, अहेरी 8, आरमोरी 1, सिरोंचा 1, कोरची 1, धानोरा 20 पोलीस व 2 स्थानिक असे 22 जण कोरोनामुक्त झाले.
तर नवीन 17 बाधितांमध्ये चामोर्शी तालुक्यातील 10 जण यामध्ये चंद्रपूर येथे रूग्णालयात भरती असलेला 1 रूग्ण, 3 जण प्रतिबंधात्मक क्षेत्रातील रूग्णाच्या संपर्कात आलेले, 1 जण गडचिरोली येथील रूग्णाच्या संपर्कातील व त्याची मुलगी बाधित आढळून आले आहेत, 4 चामोर्शी ग्रामीण रूग्णालयातील असे चामोर्शीमधील 10 जण बाधित मिळाले. आरमोरी मधील गोंदीया वरून आलेला 1 जण, अहेरी तालुक्यातील 3 जण यामध्ये रूग्णाच्या संपर्कातील 2 व आन्ध्र वरून आलेला 1जण, गडचिरोली सामान्य रूग्णालयातील रूग्णांना सेवा देणारे 3 जण बाधित असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारे आज नवीन 17 बाधित आढळून आले.
यामुळे जिल्हयातील एकुण कोरोना बाधित 889 झाले, कोरोनामुक्त 789, तर सद्या सक्रिय 99 राहिले आहेत.