अन्यथा १ सप्टेंबर पासून धान्य वितरण बंद-अशोकराव कदम

197

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर

चिपळूण : कोरोना परिस्थितीमुळे शासनाने रेशन दुकानदारांच्या अंगठ्यांचे ठसे घेऊन धान्य वितरण करण्याचे आदेश निर्गमित केले होते. यानुसार रेशन दुकानदारांनी रेशनकार्डधारकांना धान्य वितरीत केले. मात्र, आता ग्राहकांचे ठसे घेण्याबाबत पॉस मशिनवर सुचना येत आहेत. आता रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून धान्य दुकानदारांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन थेट पावतीद्वारे अथवा धान्य दुकानदारांच्या अंगठ्यांचे ठसे घेऊन धान्य वितरीत करण्यासाठी पुन्हा आदेश करावेत. अन्यथा १ सप्टेंबर पासून राज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदार धान्य वितरण करणार नाहीत, असा इशारा रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेचे अशोकराव कदम यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवदेनाद्वारे दिला आहे.
यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी असताना राज्य शासनाचे आदेश सप्टेंबर महिन्यापर्यंत एजन्सी धारकांचे अंगठ्याचे ठसे घेऊन धन्य वाटप करण्याचे होते. परंतु नुकतेच आपल्या कार्यालयाकडून १ ऑगस्टपासून ग्राहकांच्या अंगठ्याचे ठसे घेऊन धान्य वाटप करण्याचे आदेश मिळाल्याप्रमाणे सध्या जिल्ह्यात वाटप चालू आहे. परंतु, सदर चे वाटप करीत असताना एजन्सी धारकाला अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उदाहरणार्थ सर्वर बंद पडला तर मशीन बंद मशीन बंद पडले की ग्राहकांची रांग तशीच राहते. कनेक्टिव्हिटी नसली तरी ग्राहकांना उभे करून ठेवावे लागते व एजन्सी धारकाला गर्दीला सामोरे जावे लागते. एका बाजूला आपल्या मार्फत सूचना आहेत की गर्दी टाळा, सुरक्षित अंतर राखा, मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा व हात स्वच्छ ठेवा. या सगळ्या सूचनांचा वापर ग्राहकांकडून होत नाही. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या अवस्थेत धान्य दुकानदारांनी आतापर्यंत प्रशासनाला सहकार्य देऊन विनातक्रार धान्याचे वाटप केले आहे. या पुढील काळात धान्याचे वाटप विनातक्रार सुरळीतपणे जिल्ह्यातील एजन्सी धारक करतील पण आपल्या स्तरावरून अन्न नागरी पुरवठा खात्याचे प्रधान सचिव यांना संपर्क करून एजन्सी धारकाचे अंगठ्याचे ठसे घेऊन धान्य वाटपाचे आदेश ऑगस्ट महिना अखेरपर्यंत मिळावेत, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात येत आहे. ऑल महाराष्ट्र रेशनिंग फेडरेशन मार्फत केंद्र सरकार व राज्य सरकार यांना वेळोवेळी राज्यातील रेशनिंग दुकानदारांच्या अडचणींबाबत निवेदने देऊन व फोनद्वारे चर्चा करून सुद्धा केंद्र सरकार व राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करून धान्य दुकानदारांचा अपमान करीत आहेत. तसेच आमच्या काही मागण्या आहेत. त्या याप्रमाणे शासनामार्फत दुकानदार व मदतनीस यांना विमा संरक्षण देण्यात यावे. मागील चार महिन्यांचे रेशन दुकानदारांना धान्यवाटप कमिशन त्वरित मिळावे. कोरोना साथीमध्ये आजपर्यंत राज्यात 20 ते 25 रेशन दुकानदार मृत्यूमुखी पडले असून रेशन दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उपाययोजना म्हणून सोशल डिस्टनशिंगचा वापर करून दुकानदारांचे आधार अभीप्रमाणित करून पॉस मशीन द्वारे धान्य वितरण करण्याची मुभा कोरोना संपेपर्यंत शासनाने परवानगी द्यावी. अन्यथा राज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदार एक सप्टेंबरपासून धान्य वितरण करणार नाहीत असा इशारा अशोकराव कदम यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.

दखल न्यूज भारत