मरणोत्तर जीवन, सत्य की असत्य?

274

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

राजस्थान मधील गेहलोत सरकारने अनेक पुरोगामी तथा क्रांतिकारी निर्णय घेतल्याचे मीडिया तथा सोशल मीडियाच्या माध्यमातून समजले. त्यापैकी सर्वात क्रांतिकारी निर्णय म्हणजे मरणोत्तर तेरवी भोजनावरील बंदी. हा निर्णय म्हणजे पुरोगामित्वाचा खरा चेहरा असून समाजाप्रती काळजाच्या देठापासून असलेली तळमळ होय. समाजामध्ये दिवसागणिक नैसर्गिक, दीर्घ आजाराने तथा अन्य कारणाने अनेक मृत्यू होत असतात. काही मृत्यू बाजूला ठेवले तरी, जास्तीत जास्त मृत्यूमध्ये मरणोत्तर जाहीर तेरवी भोजन, हे समाजाला अपेक्षित असते. त्यावर बंदी घालणे म्हणजे जनक्षोभ ओढवून घेणे. लोकांच्या धार्मिक भावनांना हात घालणे. मग विरोधकांकडूनही त्याचा व्यवस्थित अन्वयार्थ लावून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी सापळा रचला जातो. समाजामध्ये अपप्रचार करून जनमानसात प्रतिभा आणि प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न केले जातात. तरीही राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. त्यांनी फक्त निर्णय घेऊन कायदाच केला नाही, तर त्याही पुढे पाऊल टाकत, भोजनासाठी उसनवारी करणारे किंवा मोठेपणाचा बडेजाव करत, एखाद्याने तेरवी भोजन दिलेच, तर ती जबाबदारी सरपंच तथा पटवारी यांचे वर सोपवीली आहे. जेणेकरून एखाद्या गरीब व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा उचलत भोजनासाठी उसनवारी करून त्याला कायम गुलामाची वागणूक देणाऱ्यांची समाजातील संख्या कमी व्हावी. त्याचप्रमाणे समाजातील धनदांडग्यासोबत सरपंच, पटवारी यांचे काही हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे त्यांच्याकडून त्यांना पाठीशी घालण्याचाही प्रकार होऊ शकतो. असे होऊ नये किंवा कायद्यामध्ये कुठेही पळवाट सापडू नये म्हणून कायद्याची एकही चोरवाट खुली नसल्याचे दिसून येते.
मरणोत्तर जे काही कर्मकांड केले जातात, ते सर्व जवळपास, कमी-जास्त प्रमाणात संपूर्ण भारतातच केले जातात. आणि ते मरणोत्तर असल्यामुळे आत्म्याशी संबंधित असल्याचे दिसून येते. आत्म्याशी संबंधित असे एकच नव्हे तर खूप सारे कर्मकांड करण्याची प्रथा ब्राह्मणी धर्मामध्ये आहे.
असे म्हटले जाते की देशातील इतर भागाच्या तुलनेत उत्तर भारतामध्ये हिंदी पट्ट्यातील जनता मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा, कर्मकांड, धार्मिक विधी, आत्म्याच्या मोक्षासंबंधी विविध संकल्पना दानधर्म, दक्षिणा यांच्या आहारी गेलेली असल्याचे बोलले जाते. त्याचे काही ताजे उदाहरण म्हणजे कोरोना महामारीच्या काळात कोरोना मायीचा (देवी) उदय झाला. अनेक स्त्रियांनी कोरोना देवीचे व्रत ठेवल्यामुळे एका स्त्रीला स्वतःचा प्राण गमावला लागला. दुसरे म्हणजे, देवाने अंघोळ केल्यामुळे त्याला सर्दी-पडसे होऊन पंधरा दिवसांसाठी कोरोंटायीन करण्यात आले. नंतर काही दिवसांनी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होवून त्यांनी काही फळही ग्रहण केले. त्याहीपुढे जाऊन घृणास्पद प्रकार म्हणजे भारताच्या सर्वोच्चपदी विराजमान असणारे माननीय राष्ट्रपती महोदयांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता. असे एक ना अनेक विषय याठिकाणी मांडता येतील परंतु तरीही प्रश्न हा उरतो, की लोकांनी असे का वागावे? बुद्धी अप्रामाण्यवादी गोष्टींवर विश्वास का ठेवावा? याचे उत्तर इतिहासामध्ये जाऊन शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धाचा जन्म, उत्तर भारतातील राजघराण्यात होऊन त्यांनी वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी गृहत्याग केला होता. सतत सहा वर्ष समकालीन तथा पूर्वकालीन उपलब्ध सर्व विचारधारा, साहित्य व तत्त्ववेत्त्यांच्या मार्गांचा अभ्यास करून त्यामध्ये मानवी कल्याणाचे गूढ शोधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हाती काहीही लागले नाही. कोणताही मार्ग शिल्लक नसताना बिहार राज्यातील गया येथे(त्यावेळचे मगध राज्य) बोधीवृक्षाखाली बसून सतत चार आठवडे चिंतन व मनन करून मानवी जीवन दुःखमुक्त करण्याचा मार्ग संशोधित केला. त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये पूर्वकालीन आणि समकालीन तत्त्ववेत्त्यांपैकी फक्त कपिल मुनीच्या सांख्य सिद्धांतातील काही भाग वगळता प्रचलित कोणताही विचार त्यांनी स्वीकारला नाही. त्यावेळी लोकांच्या मनाची वेदप्रामाण्य, आत्म्यावरील विश्वास, मोक्ष म्हणजे जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका, धार्मिक विधी, यज्ञ, ब्राह्मणांना दक्षिणा देणे, चातुर्वर्ण व्यवस्थेवरील विश्वास, पुनर्जन्म, कर्म म्हणजे पूर्वजन्मीच्या कर्मामुळे या जन्मीचे स्थान, जगाची निर्मिती ईश्वराने केली, सृष्टीचा मूलाधार ब्रम्ह, इत्यादी गोष्टींनी पकड केलेली होती. तथागत गौतम बुद्धांनी सतत ४५ वर्ष न थकता न थांबता प्रचलित उपलब्ध कोणत्याही साधन संसाधनांचा उपयोग न करता हजारो किलोमीटर पायी चारिका करत, हे सर्व संस्कार अनित्य तथा मिथ्या असल्याचे सिद्ध करून, मानवी मनाचं सिंचन करण्यामध्ये ते यशस्वी झाले होते.
आत्म्याच्या संदर्भातील बुद्धाचे विचार अनात्मवादी सिद्धांत म्हणून प्रचलित आहेत. ते थोडक्यात पाहू गेलो असता वैज्ञानिक दृष्टिकोनाची जाणीव होते. त्यासंबंधी बोलताना ते म्हणतात, आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनाश्रित असतो. आत्मा कोणीही पाहिला नाही. त्याच्याशी कोणीही संवाद साधला नाही. काही लोक आत्म्याला अज्ञात आणि अदृश्य समजतात परंतु बुद्ध त्याला ‘ मन ‘ असे संबोधतात. आत्म्याचे अस्तित्व मानणाऱ्यांना ते अनेक प्रश्न विचारतात. आत्मा आहे काय? तो कोठून आला? मृत्यूनंतर त्याचे काय होते? तो कुठे जातो? तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो? किती काळ तो तिथे राहतो? त्याचा आकार व आकृती कशी आहे? परंतु त्यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर आजपर्यंत कोणीही देऊ शकले नाही. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘ बुद्ध आणि त्यांचा धम्म ‘ या ग्रंथामध्ये आवर्जून मांडलेले आहे.
तथागत गौतम बुद्धाच्या धार्मिक, वैचारिक तथा सामाजिक क्रांती नंतर सम्राट अशोक मौर्य यांची राजकीय क्रांतीसाठी होवून, जवळपास चारशे वर्ष संपूर्ण(जंबुद्वीप) भारतीय उपखंड हा बुद्धाच्या समतावादी विचाराने घोडदौड करत होता. ज्याची फलश्रुती म्हणून जगाच्या तुलनेत ३१ टक्के जीडीपी एकमेव भारताचा होता. त्यामुळे विश्वामध्ये भारताची ख्याती ‘ सोने की चिडिया ‘ असल्याचे संशोधन नोबेल पारितोषिक विजेते ‘अमर्त्य सेन ‘ यांनी मांडलेले आहे. त्यानंतर भारताचा जीडीपी ९ टक्क्याच्यावर कधीच गेला नाही. आजचा शून्याकडे वाटचाल करताना दिसतो.
सम्राट अशोकाचे शेवटचे वंशज सम्राट बृहद्रथ मौर्याची हत्या त्यांचाच सेनापती पुष्यमित्र शुंगाने केल्यामुळे त्यांची सत्ता संपुष्टात येऊन बुद्ध धम्माचा राजाश्रय संपुष्टात आला. पुष्यमित्र शुंगाने भिक्षूंच्या हत्येला बक्षीस जाहीर करून प्रचारक प्रसारक संपवले. बरेच साहित्य जाळून टाकले. तो स्वतः ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी वैदिक धर्माचे पुनरुत्थान केले. काही पर्यायी साहित्य निर्माण करून जनतेच्या मनाची बुद्धिवादाची व तर्कनिष्ठतेची पकड कमी करून पुन्हा जनतेला बुद्ध तत्वज्ञानाच्या विरोधी वागण्यास, त्यांची मानसिकता पक्की करण्यात त्याला यश मिळाल्याची नोंद डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘ प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती ‘ या ग्रंथामध्ये मिळते.
वरील सर्व ऐतिहासिक घडामोडी जास्तीत जास्त उत्तर भारतात घडल्यामुळे त्या ठिकाणी वागणुकीतील मोठी कट्टरता दिसून येते.
असाच काहीसा प्रत्येय महाराष्ट्र राज्यामध्ये ही दृष्टीस पडतो. महाराष्ट्र ही महापुरुषांची जन्मभूमी तथा कर्मभूमी असल्यामुळे त्यांच्या समतावादी कार्याची आजही सामान्य जनतेला ओळख नसल्याचे दिसून येते. आपण त्यांचे नाव घेतल्यास इतरांना आपली जात कळेल किंवा ते आपल्याला आंबेडकरवादी समजतील. म्हणून बहुजन समाजातील अनेक लोक महापुरुषांचे नाव घेण्यास, त्यांचे फोटो लावण्यास, आजही कच खाताना दिसतात. काही प्रतिष्ठितांना, महापुरुषांबद्दल विचारले असता अनेकांकडे माहितीचा अभाव दिसून येतो. काही महाभाग तर म्हणतात, की त्यांनी आमच्यासाठी काहीही केले नसून फक्त डॉ. आंबेडकरांनाच मदत केली. मी माझ्या मागील एका लेखामध्ये राजर्षी शाहू महाराज हे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा उल्लेख केला असता, कित्येकांनी ते समजून घेण्यासाठी फोन करून विचारणा केली. महापुरुषांच्या आंदोलनामुळे अनेकांना सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा मिळून शहरांमध्ये त्यांचे मोठमोठे महाल उभे झाले त्या महालाच्या भिंतीवर तेहतीस कोटी गर्दी करताना दिसतात. परंतु महापुरुषांच्या प्रतिमांना त्यामध्ये स्थान मिळत नाही. वास्तविक त्याला काही अपवादही आहेत.
भारतीय सुज्ञ जनतेने तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामासामी पेरियार, संत गाडगेबाबा व बहुजनातील विज्ञानवादी संत यांची विचारधारा समजून घेऊन ती आचरणात आणल्यास, राजस्थान सरकार प्रमाणे कोणतेही कायदे करण्याची गरज पडणार नाही. महापुरुषांच्या विचारधारेवर आधारित संविधानाचे राज्य निर्माण होईल. सरकारने संविधान विरोधी कायदे केल्यास जागृत जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. पर्यायाने सर्वांचे हक्क अधिकार शाबूत राहून महान मानवी मूल्याधारित समतावादी समाजव्यवस्था निर्माण होऊन भारत देश पुन्हा विश्वामध्ये ‘ महासत्ता तथा सोने की चिडिया ‘ म्हणून नावारूपाला येईल.

भिमराव परघरमोल
व्याख्याता तथा अभ्यासक
फुले शाहू आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जि. अकोला
मो.९६०४०५६१०४