आरोपींने केली पोलीस पाटलास मारहाण न्यायालयाने आरोपीस ३ वर्षाचा कारावास आणी ५ हजारांचा दंड ठोठावला आरमोरी तालुक्यातील घटना – जिल्हा व सत्र न्यायाधिश – २ दे.ग. कांबळे यांचा निकाल

551

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत

आरमोरी :-
पोलिस पाटलास दगडाने मारहाण करणाऱ्या आरोपीस गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश – २ दे.ग. कांबळे यांनी ३ वर्षांचा कारावास आणि ५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
विलास गोविंदा धनकर (५०) रा. वैरागड ता. आरमोरी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी विलास धनकर याने २१ नोव्हेंबर २०१७ रोजी वैरागड येथील पोलिस पाटलास तू माझा नाव पोलिसांना का सांगितलास असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच त्यांना मारहाण केली. पोलिस पाटलाने मारहाण कशाला करीत आहेस, अशी विचारणा केली असता आरोपीने नालीतील दगड उचलून फेकून मारला. यामुळे पोलिस पाटलाच्या उजव्या हाताला व छातीवर मार लागून दुःखापत झाली. तसेच आरोपीने घटनास्थळी असलेल्या कुशाल सावरकर यांनासुध्दा दगड फेकून मारल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. याबाबत आरमोरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
आरमोरी पोलिसांनी कलम ३५३, ३२४, २९४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक डी.बी.इरपाते यांनी केला. आरोपीविरूध्द सबळ पुरावे मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण नोंदविण्यात आले. वैद्यकीय अहवाल तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस काल २० ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता एन.एम. भांडकर यांनी काम पाहिले.