असभ्य वागणुक देणाऱ्या ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बीडीओ सह तहसीलदार यांना निवेदन

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

मारेगाव:रहिवासी दाखला हवा म्हणून ग्रामसेवकाला विचारणा केली असता उद्धट उत्तर देत तुम्ही विचारणारे कोण असा उलट जवाब देणाऱ्या ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मारेगाव यांच्यावतीने देण्यात आले.

गाडेगाव-चनोडा गटग्रामपंचायत असून येथे नीलेश म्हसे येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना गावातीलच निखील काकडे यांनी रहिवासी दाखला मिळणेबाबत विचारणा केली असता तो मिळाला नाही. यासंदर्भात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हा सरचिटणीस सचिन काकडे यांनी ग्रामसेवकाला भ्रमणध्वनी वरून विचारणा केली असता तुम्ही विचारणारे कोण असे उलट उत्तर दिले. याविषयी त्यांना पत्रकारितेच्या संदर्भात माहिती दिली. परंतु मला पत्रकारांशी काहीही देणेघेणे नाही, मी कोणालाही ओळखत नाही असे उद्धट उत्तर दिले असे निवेदनात नमूद केले आहे .

वास्तविक ग्रामसेवकावर ज्या गावांची जबाबदारी असते त्या गावांना आठवड्यात दोनदा तरी भेट देऊन जनतेचे तसेच समस्यांचे निराकरण करणे आवश्यक असते परंतु म्हसे सारखे काही ग्रामसेवक हे उंटावरून शेळ्या हाकल्यासारखे दुसऱ्या गावावरून गाडेगाव या ग्रामपंचायतचा कारभार पाहत आहे. गावात येऊन योग्य सेवा न देणे, जनतेची कामे विलंबाने करणे, सामान्य व्यक्तीशी उद्धट बोलणाऱ्या या ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य च्या मारेगाव शाखेतर्फे बीडीओ तसेच तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी सचिन काकडे, अनंता गोवर्धन, पंकज नेहारे, सचिन मेश्राम, सुदर्शन टेकाम आणि आनंद नक्षणे उपस्थित होते.