पीएसआय निवडीचे प्रमाण वाढवा शारीरिक चाचणी : प्रमाण 1:4 वरुन 1:6 करण्याची छात्रभारतीची एमपीएससीकडे मागणी.

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई, दि.२१ पोलीस उपनिरीक्षक अर्थात ‘पीएसआय’ च्या शारीरिक चाचणीसाठी गेल्या पाच वर्षात जवळपास 45 टक्के उमेदवार गैरहजर राहत असल्याची माहिती पुढे आली आहे. एवढेच नव्हे, तर शारीरिक चाचणीत अपात्र उमेदवारांची संख्याही अधिक आहे. त्याचा परिणाम एक किंवा दोन गुणांनी शारीरिक चाचणीसाठी अपात्र ठरलेल्या उमेदवारांवर होत असून त्यांची संधीच हिरावून घेतली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शारीरिक चाचणीसाठी उमेदवार निवडीचे प्रमाण 1:4 वरून 1.6 करावे, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने एमपीएससीचे अध्यक्ष सतीश गवई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

MPSC परिक्षेसाठी लाखो उमेदवार जवळपास तीन-चार वर्षापासुन स्पर्धा परिक्षांची तयारी करतात अश्या परिस्थितीत पीएसआयच्या शारीरिक चाचणी परिक्षेसाठी केवळ निम्मेच उमेदवार उपस्थित राहत असतील तर हे योग्य नाही ज्याप्रमाणे मुख्य परिक्षेसाठी उमेदवार निवडीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे तसेच पीएसआयच्या शारिरिक चाचणीसाठी उमेदवार निवडीचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आयोगाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी केली आहे.

संपुर्ण महाराष्ट्रात पीएसआय या पदाच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी आहे.ज्या विद्यार्थ्यांची उंची किंवा शारीरिक क्षमता नसताना देखील या परिक्षेचा अर्ज भरला जातो.असे पात्रता नसलेले अनेक उमेदवार शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहत नाहीत यामुळे जे उमेदवार केवळ पीएसआयची तयारी करतात त्यांना फटका बसतो त्यामुळे उमेदवार निवडीचे प्रमाण बदलल्यास अनेकांना संधी मिळु शकते असे रोहित ढालेंनी सांगितले.