आरमोरी तालुक्यातील मानापूर येथील पानठेला धारकांवर मुक्तीपथची धडक मुक्तिपथ- ग्राम प्रशासन यांच्या सहकार्याने केली -कारवाई

595

 

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी

आरमोरी : लॉकडाऊनचा फायदा घेऊन काही पानठेला धारक अवैध खर्रा विक्री जिल्ह्याभरात करत आहे.या पार्श्वभूमीवर आरमोरी तालुक्यातील मानापुर येथे पानठेले उघडून खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणा-या चार जणांवर ग्राम प्रशासनाने मुक्तीपथ अभियानाच्या सहकार्याने दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच गावात पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार नाही, अशी हमी पानठेला धारकानी दिली आहे.
कोरोना विषानुचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध योजना आखीत आहे. जिल्हाधिका-यांनी वर्षभरासाठी पानठेले व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. विविध माध्यमातून जनजागृती केल्या जात आहे. तरी सुद्धा काही भागात छुप्या मार्गाने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरूच आहे.
मानापूर येथे पानठेले उघडून खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती ग्राम प्रशासनाला मिळाली. त्यानुसार मुक्तीपथ गाव संघटना व ग्राम प्रशासन यांनी गावातील पानठेले धारकाकडे आवश्यक चौकशी केली असता चार जणांकडे खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला. याप्रकरणी ग्राम प्रशासनाने प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे 800 रूपयांचा दंड वसूल केला आहे. जप्त करण्यात आलेला तंबाखूजन्य पदार्थ नष्ट करण्यात आला. तसेच पुन्हा खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार नाही, या आशयाच्या हमीपत्रावर पानठेला धारकांनी स्वाक्षरी केली. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा प्रसार होतो. त्यामुळे अनेक गावकर्‍यांनी स्वता पुढाकार घेऊन तंबाखूबंदीचा ठराव घेतला आहे. काही गावात त्याची अमलबजावणी सुद्धा होताना दिसत आहे.
यावेळी पोलिस पाटील ऋषी मोहूर्ले, मुक्तीपथचे तालुका उपसंघटक प्रकाश कुनघाडकर, ग्रामसेवक ढोरे यांच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.