गणेशोत्सव व मोहरम साधेपणाने साजरा करा, नुरुल हसन यांचे प्रतिपादन

0
252

 

वणी:- परशुराम पोटे

शंभर वर्षांपूर्वी सन 1912 मध्ये स्पॅनिश फ्लू नावाची महामारी आली होती. त्यात जीवितहानी खूप मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यानंतर शंभर वर्षानंतर आता कोरोनाच्या रूपाने महासंकट निर्माण झाले आहे. या संकटावर मात करण्यासाठी या वर्षी गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करा, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी केले आहे. ते वणी येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते.
येथील शेतकरी मंदिराच्या सभागृहात आयोजित शांतता समितीच्या सभागृहात नुरुल हसन यांच्या सोबत आय.ए.एस. अधिकारी आदित्यकुमार हिराणी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पोलीस निरीक्षक वैभव जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वणी शांतता समिती तर्फे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक नुरुल हसन पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य संग्राम सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या देशातून इंग्रजांना हद्दपार करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. आज आपल्याला आपल्या देशावर आलेले कोरोना रुपी संकट या देशातून हद्दपार करण्यासाठी या उत्सवाचा उपयोग करून घेऊ या असे प्रतिपादन त्यांनी केले. या सणा निमित्त कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही. सार्वजनिक श्रीगणेशाची मुर्ती चार फुटापेक्षा मोठी असू नये. श्रींच्या मूर्तीचे घरीच विसर्जन करावे. आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावर टाकू नये. घरगुती गणेशोत्सवात सुद्धा खूप काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी कोरोना काळात साडेतीन हजर सुती मास्क शिवून दिल्याबद्दल व अनिल आक्केवार, शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाबापूर येथील गणेश मंडळाचे अध्यक्ष संजय भोयर यांनी तेथील जत्रा रद्द करून सहकार्य केल्याबद्दल या प्रसंगी दोघांचाही सन्मान करण्यात आला. या प्रसंगी शांतता समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या विविध समस्यांची दखल घेऊन ते सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.
या सभेचे संचालन रवी साल्पेकर, आभार पोलीस सब इन्स्पेक्टर प्रताप बाजड यांनी केले.