सामाजिक जाणिवेच्या भावनेतून बँकेतर्फे सेवानिवृत्तांचा सत्कार – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रम

148

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी

आरमोरी:- शेतकरी व सर्वसामान्य माणसांची बँक म्हणून अलौकीक प्रतिष्ठा तयार केलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. स्वातंत्रदिनी १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र विद्यालयातील दोन शिक्षकांचा सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार करुन वैरागड येथिल शाखेने एक नवीन आदर्श स्थापित केला असून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
केवळ देवाण- घेवाण या व्यावहारिक शब्दांत गुंतून नफा कमावण्याचा उद्देश न ठेवता सर्वसामान्य जनतेशी जुळलेली नाळ अधिक घट्ट करण्याचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नेहमीच प्रयत्न असतो. यातूनच सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचे अनमोल कार्य केल्या जाते. ” विना सहकार नहीं उद्धार” हे ब्रिद वाक्य घातलेल्या या बँकेने कसोटीवर उतरत शेतकरी व सर्वसामान्यांची बँक म्हणून स्वतःची एक नविन ओळख निर्माण केली आहे. बदलत्या परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवून जनतेच्या सेवार्थ अनेक नविन उपक्रम हाती घेतले आहेत. केवळ जनतेचे हित नजरेसमोर ठेऊन केलेल्या अनेक उपक्रमांना अल्पावधीतच ही बँक नावलौकिकास पात्र ठरली.
यावर्षी कोरीना या विषाणूमुळे कोविड १९ या आजाराचा प्रादुर्भाव उद्भवला असतांना जनतेचा यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी बँकेनी नानाप्रकारे प्रयत्न केले. शिवाय दैनंदिन आर्थिक व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी स्वतः परिश्रम घेऊन चोख बंदोबस्तात आर्थिक व्यवहार अधिक सुलभ केला. पर्यायाने कोणताही त्रास अगर धोका न होता जनतेला या बँकेशी व्यवहार करता आले. प्रतिकूल परिस्थितीत बँक कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाची दखल घेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रचित पोरेड्डीवर यांनी जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करीत त्यांनी कौतुकाने पाठ थोपटली.
बँकेची आर्थिक भरभराट होत असतांना कर्मचाऱ्यांचे परिश्रम महत्वाचे असले तरी ग्राहकांचे बँकेप्रति असलेली आपुलकीची भावना महत्वपूर्ण आहे. त्यामुळेच ग्राहकांकडून मिळालेल्या सहकार्याच्या जोरावरच बँकेला यशाची उंची गाठता आली. या सर्व बाबींचे भान ठेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रांचित पोरेड्डीवर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात. त्यांच्या संकल्पनेतून एक नवीन पायंडा कर्मचाऱ्यांना घालून दिला असून बँकेत पगार होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवा निवृत्ती सत्कार करण्याचे बँकेने ठरविले आहे. याच माध्यमातून वैरागड येथिल शाखेने स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विद्यालय वैरागड येथील सेवा निवृत्त शिक्षक आर. डब्ल्यू. विखार व शिडाम यांचा सपत्नीक सत्कार बँकेच्या सभागृहात संचालक वालदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक पद्माकर शेबे, द्वितीय श्रेणी अधिकारी आचरवार, निरीक्षक जुमनाके, लिपिक आर. ए. अत्रे, एच. एम. हेडाऊ, शिल्पा वनार्से, सुजाता दोनाडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.