हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना भारतरत्न द्या ! तालुका प्रमुख सुदर्शन नाईक

 

माहूर (प्रतिनिधी पवन कोंडे)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतरावजी नाईकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी आज दि.20 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
सलग ११ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची धुरा यशस्वी पणे संभाळली.त्याकालावधीत सखोल अभ्यास करून देशामध्ये पहिली हरितक्रांती घडवून आणली त्यामुळे साहजिकच बळीराजा (शेतकरी) सुखी,समाधानी व स्वावलंबी झाला.त्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केल्याचा उल्लेख सुदर्शन यांनी आपल्या निवेदनात केला आहे. स्व.वसंतरावजी नाईक यांच्या पावलावर पाउल ठेवत अनेकांनी महाराष्ट्र राज्याचा कारभार चालविला,त्यांनी महाराष्ट्र व देशाला दिलेले योगदान अतुलनीय असून अशा थोर महापुरुषाचा गौरव होणे, त्यांच्या कार्याची पुढील पिढीला ओळख होणे नितांत गरजेचे असल्याची बाब आपल्या निवेदनात नमूद करून देशातील सर्वोच्च मानला जाणारा भारतरत्न पुरस्कार स्व.वसंतराव नाईकांना मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे