बिग ब्रेकिंग कोरोना रुग्णाने खिडकीतून धूम ठोकली ; परिसरात खळबळ कोरची येथील घटना

0
144

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी

कोरची : येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात विलगीकरणात असलेल्या एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाने १७ ऑगस्ट रोजी वसतिगृहातील कोरोना विलगिकरण कक्षातून पलायन केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. सदर इसम स्वछतागृहाच्या खिडकीतून पळून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार ९ ऑगस्टला तामिळनाडूहून आलेल्या कैमूल (सावली) येथील एका मजुरास कोरची येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. १७ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजता त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्याचा अहवाल आला. याविषयीची माहिती होताच रात्री भोजन केल्यानंतर त्याने विलगीकरण कक्षातून पलायन केले. १८ ऑगस्ट रोजी सकाळी रुग्णांना नाश्ता देतेवेळी एक रुग्ण गायब असल्याची बाब लक्षात येताच अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर या प्रकाराची तक्रार कोरची पोलिस ठाण्यात देण्यात आली, अशी माहिती डॉ.सचिन बरडे यांनी दिली.
विशेष म्हणजे, रुग्ण फरार झाल्यानंतर आरोगय विभागाचे कर्मचारी आणि पोलिस त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाले असून, सकाळपासूनच ते त्याला शोधण्याचा प्रयत्न करीत होते.
याबाबत डॉ. बरडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वसतीगृहाचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आला होता. तसेच कर्तव्यावरील कर्मचारी सुद्धा कर्तव्य बजावत होते. परंतु सदर रुग्ण स्वछतागृहाची खिडकी तोडून पळाल्याचे निदर्शनास येत आहे. स्वछतागृहाची खिडकी मोठी असून एक फुटाची पोकळी आहे. यामुळे तो सहज बाहेर गेला. बाहेरील गवतावर सुद्धा त्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. एकदा त्याने मोबाइल वरून बोलल्याचेही डॉ. बरडे यांनी सांगितले. लवकरच त्याला उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.