खडकवासला मतदार संघातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा.

103

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
खडकवासला मतदार संघातील मुख्य रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. जी कामे झाली आहेत, ती पण निकृष्ट दर्जाची झाली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. नांदेड फाटा कडबा कुट्टीसमोर दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. तसेच उत्तमनगर रस्त्यावर देखील टेलिफोन एक्सचेन्ज समोर रस्त्यावर पाणी साठले आहे. या रस्त्यावरील ब्लॉक रस्त्यावर विखुरले आहेत. याठिकाणी रोजच अपघात होत आहेत. तसेच या रस्त्यावरील देशमुख वाडी शिवणे व दुधाने पेट्रोल पंप समोर देखील रस्ता उखडला आहे. या रस्त्यावर देखील अनेक खड्डे पडले असून पाणी साठल्यामुळे शेवाळ होऊन लोक घसरून पडत आहेत. रस्त्याचे कडेला नवीन बसवलेले ब्लॉक देखील सुटले आहेत. सिंहगड रस्त्यावर नांदेड सिटी मेनगेट पुढे कडबा कुट्टीसमोर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. तसेच गोऱ्हे खुर्द ते खानापूर या रस्त्यावर देखील मोठे खड्डे पडले आहेत. या सर्व रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शिवसेना खडकवासला मतदार संघातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री. चौगुले साहेब व राठोड साहेब यांचेकडे करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा विधानसभा प्रमुख नितीन वाघ, उपतालुका प्रमुख संतोष शेलार,विभागप्रमुख रामदास गायकवाड, युवासेना जिल्हा समन्वयक बाबा खिरीड व शिवसैनिक अभिजित पायगुडे यांनी दिला आहे.