सप्टेंबर महिन्यात कोरोना संसर्गाबाबत जास्त सतर्क राहण्याची गरज- ना.विजय वडेट्टीवार

158

 

अशोक खंडारे उपसंपादक
गडचिरोली : कोरोना बाबत सप्टेंबर महिना गडचिरोलीकरांसाठी महत्वाचा राहणार, त्यावेळी संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनासह लोकांनी आवश्यक काळजी घ्यावी व बचावासाठी सतर्क रहावे असे आवाहन ना.विजय वडेट्टीवार मंत्री, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन यांनी आढावा बैठकी दरम्यान केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व पूरपरिस्थितीवर आढावा बैठक मा.मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत माहिती दिली व पूरस्थिती बाबत सादरीकरण केले. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार धर्मरावबाबा आत्राम, अति.पोलीस अधिक्षक डॉ.मोहित गर्ग, उपाध्यक्ष मनोहर पोरेटी पाटील, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, जि.प. सदस्य ॲङ. रामभाऊ मेश्राम व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
प्रत्येक शहरात ठराविक काळात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ नागपूर या ठिकाणीही मोठया प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एका ठराविक वेळेत संख्या वाढलेली दिसून येते. गडचिरोली जिल्हयातही रुग्णांच्या संख्येच्या वाढीनुसार सप्टेंबर महिना महत्वाचा राहणार आहे असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सादरीकरणात माहिती दिली. यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सप्टेंबर महिन्यात रुग्ण संख्या वाढत असेल तर त्याबाबत आवश्यक व्यवस्थापन करा अशा सुचना दिल्या. जिल्हयातील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करा. सार्वजनिक कार्यक्रमावर संख्येच्या पलीकडे गर्दी होत असेल तर कारवाई करा असे आदेश त्यांनी प्रशसनाला दिले. त्याचबरोबर रुग्णांच्या उपचारादरम्यान उपलब्ध मनुष्यबळ व रुग्णसेवा यांचे योग्य व्यवस्थापन करा. यातून प्रत्येक रुग्णाला आवश्यक उपचार देता येतील याकडे लक्ष द्या असे निर्देश त्यांनी जिल्हा शल्य चिकीत् सक डॉ. अनिल रुडे व जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर यांना दिले.

बैठकीमध्ये जिल्ह्यातील भामरागड, सिरोंचा येथील काल आलेल्या पूराबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी आवश्यक मदत नागरिकांना वेळेत द्या अशा सूचना केल्या. दरवेळी अहेरी, सिरोंचा व भामरागडमध्ये पूरपरिस्थितीमूळे जनजीवन विस्कळीत होते. त्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी कोणकोणती कामे आवश्यक आहेत ती ठरवून त्यांचे प्रस्ताव तातडीने सादर करा. आपत्ती पासून लोकांना दूर ठेवून चांगल्या प्रकारे जीवन जगता यावे यासाठी मी निधी कमी पडू देणार नाही असे मंत्री यांनी उपस्थित विभाग प्रमुखांना सांगितले. यानूसार संबंधित विभाग यामध्ये बांधकाम, महावितरण व आरोग्य यांना तातडीने आवश्यक कामांसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

जिल्ह्यात पूरपरिस्थितीवर नियंत्रणासाठी साहित्य :

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी मंत्री महोदयांना जिल्ह्यात 6 रबर बोट, 14 सुरक्षा टेंट, 210 लाइफ-बॉय, 210 लाईफ जॅकेटसह इतर आवश्यक साहित्य मिळाल्याचे सांगितले. सदर साहित्याचे वाटप पूरपरिस्थिती उद्भवणाऱ्या तालुक्यांना पोहच केल्याचेही त्यांनी नमूद केले. सदर सर्व साहित्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजूर केलेल्या निधीतून घेण्यात आले आहे. यावेळी मंत्री महोदयांनी संबंधित साहित्यामधून सामान्यांना चांगली सेवा देता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

वीज समस्येबाबत राज्यस्तरीय बैठक लावण्याचे निर्देश- जिल्ह्यातील दुर्गम भागातील वीज पूरवठा सुरळीत होण्यासाठी व नव्याने मंजूर असलेल्या सब स्टेशनच्या निधी व मंजूरीबाबत राज्यस्तरीय बैठक लावण्याचे निर्देश वडेट्टीवार यांनी दिले. यामध्ये संबधित विभागाचे मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी यांच्या बरोबर येत्या आठवडयात व्ही.सी. द्वारे चर्चा करुन वीज समस्या ताडीने सोडविण्यासाठी चर्चा केली जाणार आहे.