प्रशासनातर्फे पूरपरिस्थितीवर उत्तम प्रकारे नियंत्रण.

0
96

अशोक खंडारे उपसंपादक
यावर्षी पहिल्यांदा भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला महापूर आला.१६ आगष्टला पहाटे तीन वाजल्यापासून पर्लकोटेच्या पाण्याची पातळी वाढायला लागली.सकाळी सात वाजेपर्यंत मुख्यतः बाजारपेठ महापूराने कवेत घेतली.मात्र येथील महसूल विभाग, नगरपंचायत व पोलीस प्रशासन इत्यादीचे अथक प्रयत्नांमुळे पूरपरिस्थितीवर उत्तम नियंत्रण ठेवता आले.त्यामुळे प्राणहानी व वित्तहानी टाळता आली.
पर्लकोटेच्या पाण्याची पातळी वाढू लागताच प्रशासनातर्फे सकाळी ५ वाजता पासून ध्वनिक्षेपकावर व्यापाऱ्यांना व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या.अडलेल्या लोकांना प्रशासनाच्या बचाव पथकांनी बोटीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी पोचविले.१५ दिवसांपूर्वी पंचायत समिती भामरागड येथे रुजू झालेले संवर्ग विकास अधिकारी सोनटक्के हे वनविभागाच्या विश्रामगृहात मुक्कामी होते.मात्र सकाळी ८ वाजेपर्यंत महापूराचे पाणी मुख्यतः चौकापर्यंत आले.त्यामुळे विश्रामगृहाकडे जाणारा मार्ग बंद पडला.संवर्ग विकास अधिकारी सोनटक्के विश्रामगृहात असल्याचे कळताच स्वत: उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे,नायब तहसीलदार अनमोल कांबळे व नगरपंचायतचे कर्मचारी बोटीने गेले व सोनटक्के यांना सुखरूप घेऊन आले.तसेच दिवसभर बचाव पथकाच्या टीमने बोटीने फिरून कोणी अडकलेला तर नाही ना याची पाहणी करिता होते.पूरग्रस्थांना तात्पुरती सोय म्हणून शाळा उपलब्ध करुन दिली होती.नदीकडे व महापूर असलेल्या ठिकाणी कोणी जावू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.वीज नसल्याने मुख्य चौकात प्रशासनातर्फे एल.ई.डी.लाईट लावला होता.
एकंदरीत प्रशासनाच्या उत्तम कामगिरीमुळे पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले.तहसिलदार सत्यनारायण सिलमवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे,नायब तहसीलदार प्रकाश पुप्पूलवार,नायब तहसीलदार अनमोल कांबळे, नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ.सूरज जाधव,सहा. पोलीस निरीक्षक गजानन पडळकर, ,पो.उप.निरीक्षक ज्ञानेश्वर झोल,पो.उप.निरिक्षक मंगेश कराडे इत्यादी पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेऊन होते.महसूल कर्मचारी, पोलिस कर्मचारी व नगरपंचायतचे कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.