जीवघेणे खड्यांवर भ्रष्टाचार विरोधी समिती कोरचीचा बेशरमचे झाडे लावा आंदोलन

119

 

कोरची
कोरची तालुक्यातील कोरची – भिमपुर हा रस्ता मुख्य रस्त्या पैकी एक असून सदर रस्ता हा राज्य महामार्ग आहे. तसेच हा रस्ता छत्तीसगडला सुद्धा जोडला गेल्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. कोरची भिमपुर रस्त्याची दरवर्षी दयनीय अवस्था होत असून प्रशासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे. या रस्त्यावर कित्येक दुचाकीस्वार गंभीर रित्या जखमी सुद्धा झालेले आहेत तर मग याची जिम्मेदारी संबंधित विभाग येईल का? असा प्रश्न निर्माण होत आहे. या रस्त्याची व्यवस्थितपणे डागडुजी करण्यात यावी अशी मागणी 3 ऑगस्ट ला जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांना निवेदनातून तहसीलदार यांच्या मार्फत करण्यात आली होती व दिनांक 15 ऑगस्टपर्यंत व्यवस्थितपणे डागडुजी न झाल्यास बेशरमचे झाडे लावून आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला होता. परंतु या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे दिनांक 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कोरची – भिमपुर मार्गातील खड्ड्यांवर बेशरमचे झाडे लावून अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती तर्फे आंदोलन करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतरही तालुक्याची पाहिजे तशी प्रगती झाली नाही. दरवर्षी तसेच खड्डे आणि अधिकाऱ्यांचे उडवाउडवीचे उत्तरे! नुकतेच भिमपुर रस्त्यावर पाचशे मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम एका बाजूला झाले असून सदर रस्ता खूप अरुंद बांधण्यात आला आहे आणि यामुळे या रस्त्यावर कित्येकदा ट्रक फसले आहेत ज्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. नवीन बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या सुरुवातीला व शेवटी स्लोप न दिल्यामुळे दुचाकीस्वार व चार चाकी वाल्यांना तारेवरची कसरत करावी लागत असुन या रस्त्यामुळे छोट्या वाहनांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच भ्रष्टाचार विरोधी समिती कोरचीने या रस्त्याच्या चौकशीची मागणी केली असून या रस्त्यामध्ये कित्येक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या रस्त्याचे त्वरित व्यवस्थितपणे काम पूर्ण करण्यात यावे अन्यथा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल, जितेंद्र सहारे, सिद्धार्थ राऊत, शाम यादव, भूमेश शेंडे, धम्मदीप लाडे, निखिल साखरे, बंटी जनबंधू, अभिजीत निंबेकर, रवींद्र बावणे, कृष्णा वंजारी, रवी जनबंधु आदी उपस्थित होते.