म. न. से. सैनिक ठरला खरा कोरोना योद्धा

138

 

मुरबाडदि.१६.(सुभाष जाधव) मुरबाड करांच्या लोक हिताच्या कोणत्याही कामांसाठी सनदशीर मार्गाने अवलंब करूनही संबंधीत प्रशासनाने दखल घेण्यात कुचराई केल्यास मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरून किंवा त्या अधिकाऱ्याची खुर्चीच रस्त्यावर फेकणाऱ्या प्रखर आंदोलक म्हणून नरेश देसले यांची ओळख आहे. राजकारणा बरोबरच सामाजीक भान जपत त्यांनी कोविड19 च्या काळात खरा कोरोना योद्धा म्हणून सचोटीने काम केलंय पण प्रसिध्दी पासून सुरक्षीत अंतर ठेवूनच..!

आज काल कोरोना योध्यानच्या सर्टिफिकेट वाटपाच्या अनेक संस्था ऑनलाईन दिसत आहेत. वाटप कामांचे पाच पंचवीस फोटो काढून सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल करून आपण फार मोठे उपकार केल्याच्या अविर्भावात कोरोना योध्याचा तथाकथित दाखला घेण्यास पात्र झाले आहे.

या सर्व प्रकरणात खऱ्या खुऱ्या योध्यानचा अपमानच होत आहे. डॉक्टर,वैद्यकीय स्टाफ,पोलीस बांधव, नगरपंचायत सफाई कर्मचारी, पत्रकार बांधव यांच्या सोबत काही निवडक राजकीय मंडळीनी खऱ्या अर्थाने कोरोनाच्या काळात योध्याचे काम केले आहे.

मुरबाड मधील काही निवडक राजकीय मंडळीं मध्ये मुरबाड शहराचे मनसेचे शहर अध्यक्ष नरेश देसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार खरंच कौतुकास्पद काम केलं आहे आणी या निमिताने त्याचा उहापोह करणे क्रमप्राप्त ठरेल.

काही महिने मागे वळून पाहिले असता कोरोनाच्या महासंकटात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या स्थलांतरीत मजुरांचे लोंढेच्या लोंढे मुरबाड तालुक्यातुन रस्ता तुडवीत आपल्या गावाकडं जात होते. आपल्या राजकीय भूमिके सोबत आपण समाजाचं काही तरी देणं लागतो याची प्रखर जाणीव असलेल्या नरेश देसले यांनी आपल्या काही पत्रकार बांधवा सोबत अडचणीत सापडलेल्या त्या मजुरांना मदतीचा हात दिलाय. तळपत्या उन्हात आपल्या कुटुंब कबिल्यासह आग ओकणाऱ्या डांबरी रस्त्यावर अनवाणी चालणाऱ्या मजुरांच्या थकलेल्या पायांना चपला देऊन त्यांना आपल्या ध्येया कडे जाण्यास सहकार्य केलंय त्यांच्या भूकेल्या पोटात अन्नाचे चार घास जावेत म्हणून रस्तोरस्ती अन्नछत्र उभारून अन्नदानाचे पवित्र काम केलं आहे. त्या सोबत त्यांच्या आरोग्यासाठी दवा औषधे देऊन कोरोनाच्या जखमेवर मलम लावण्याचे काम निस्वार्थीपणे केलंय.मुरबाड शहरातील दुकानां मध्ये गर्दी होऊ नये सुरक्षित अंतर राहावे म्हणून नगर पंचायत कर्मचाऱ्यां सोबत आपली मनसेची टीमने रस्त्यावर उतरून नागरिकांना सोशल डिस्टनसिंगचे महत्व पटवून दिले आहे. कोरोनाच्या काळात मुरबाड मधील कारखान्या मधील कामगार वर्गाला मालक वर्ग पगार देत नव्हते, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त कंपनीच्या पगारावर अवलंबून असणाऱ्या स्थानीक भूमिपुत्र कामगारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती त्या वेळी कारखाना मालकांना मनसेचा इंगा दाखवीत अनेक कामगारांना लॉक डाऊन काळातही पगार मिळवून देऊन श्रमिकांना आधार दिला आहे.

अशा खऱ्या समाज सेवकाला,खऱ्या कोरोना योध्याला कोणताही गर्व नाही एका मनसैनिकानी आपले कर्तव्य चोख पाडले असून त्यातून मिळालेले समाधान हे कोणत्याही कोरोना योध्याच्या सर्टिफिकेट पेक्षा कमी नाही अशी भावना खरा कोरोना योद्धा नरेश देसले यांनी व्यक्त केलीय