Home चंद्रपूर  पाणीवापर संस्थांचे लेखा परीक्षण शिबीर संपन्न

पाणीवापर संस्थांचे लेखा परीक्षण शिबीर संपन्न

19

 

सावली:-(सुधाकर दुधे)
‌‌ गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प अंतर्गत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर आणि मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था, मुंबई विद्यापीठ यांच्या वतीने पाणी वापर संस्था सक्षमीकरण करिता गोसेखुर्द उजवा कालवा उपविभाग क्रमांक ०६ आणि आसोलामेंढा कालवे उपविभाग ब्रम्हपुरी विभागातील २० पाणी वापर संस्थांचे एकदिवसीय लेखापरीक्षण शिबीर सावली तालुक्यातील गेवरा बुज येथील सेवा सहकारी संस्थेत दि.२७जानेवारी २०२२ रोजी पार पडले. यावेळी लेखापरीक्षक श्री.लकी छाबडा, मुंबई विद्यापीठाचे प्रकल्प स्तरीय समन्वयक श्री.शशांक रायबोर्डे, गट समन्वयक श्री. आशिष दुधे, सामाजिक कार्यकर्ता श्री. संजय इंगळे, सामाजिक कार्यकर्ता श्री. मनोज कोरडे, प्रशिक्षक श्री. अमोल गडदे, क्षेत्रीय समन्वयक श्री. राहुल सिंगनजुडे, श्री. विश्वास मेश्राम आणि २० पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. या सर्व पाणी वापर संस्था सन २०१९-२०२० मध्ये स्थापन झालेल्या आहेत. ब्रम्हपुरी विभागीय कार्यालयापासुन या संस्था ६०-७० किलोमीटर दूर असल्याने एकाच वेळी एकाच ठिकाणी सर्वांना सोयीस्कर होईल असे मध्यवर्ती ठिकाण मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था मुंबई विद्यापीठाच्या अधिकार्‍यांनी निवडले होते.
यावेळी प्रकल्प समन्वयक मा. श्री. शशांक रायबोर्डे यांनी पाणी वापर संस्था सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाने तयार केलेल्या दश सूत्री मधील सूत्र क्रमांक ०५ नियमित लेखे अद्ययावत ठेवणे या विषयावर विस्तृत प्रशिक्षण देण्यात आले. ज्यात रोकडवही, जडसंग्रह, नफा तोटा पत्र, मक्ता व दायित्व, पाणी मागणी, पाणीपट्टी बिल, सभासदाच्या नोंदी या कार्यालयीन दस्तऐवज बाबींवर विस्तृत भाष्य केले. तसेच लेखापरीक्षक श्री. लकी छाबडा यांनी संस्थांच्या लेखापरीक्षण संदर्भात लेखापरीक्षणाचे महत्त्व, गरज व फायदे समजून सांगितले. शेवटच्या सत्रात मुक्त परिसंवाद घेण्यात आला. यावेळी उपस्थितांनी काही अडचणी मांडल्या. ज्यात एकसुराने असा निष्कर्ष दिसून आला की विभागाकडून संस्थांशी सतत समन्वय घडून येणे गरजेचे आहे.

या लेखापरीक्षण शिबिराचे संचलन गट समन्वयक श्री. आशिष दुधे यांनी केले.
शेवटी आभारप्रदर्शन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पाणी वापर संस्थेचे सचिव श्री. ऐरावत रामटेके यांनी केले.

या शिबिराच्या आयोजनासाठी मुंबई विद्यापीठाचे अधिकारी चमू आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पाणी वापर संस्था, गेवरा बूज यांचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. किरण चन्नवार यांनी विशेष मेहनत घेतली.

Previous articleत्रूटी दूर करुन अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा खास. अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना अतिक्रमण व महामार्ग संदर्भाने दिले निर्देश गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात खास . अशोक नेते व अधिकाऱ्यांची बैठक
Next articleजंगलातील कुपकामावर जाऊन दिलीप घोडाम यांनी जाणल्या समस्या