Home महाराष्ट्र श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ

21

 

आळंदी : गेली 68 वर्ष समाजातील तळागाळातील कुटुंबाच्या मुलांपासून ते सर्व स्तरातील विद्यार्थ्याकरिता ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्यावतीने श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत नियोजित माऊली बागेत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन ह. भ. प. शांतिब्रह्म मारुती महाराज कुऱ्हेकर व ह. भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. कार्यक्रमाची सुरुवात माऊलींच्या मूर्ती पूजनाने झाली. तसेच कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, कलश पूजन मयूर शेठ मोहिते (उद्योजक, खेड), ग्रंथपूजन ह. भ. प. परमेश्वर महाराज जायभाये, वीणा पूजन ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यानिमित्ताने या कार्यक्रमास प. पू. गोविंद देवगिरीजी महाराज (कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी न्यास) यांनी शुभ आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. व स्व. प्रा. गोपाळराव माळवदे (बेळगाव) यांनी कानडी भाषेतील अनुवादीत ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील ग्रंथालयास भेट दिल्याबद्दल माळवदे कुटुंबियांचा स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वामीजींच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त 73 दिवे प्रज्वलित करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे व त्यांचे सहकारी, खजिनदार डॉ. दिपक पाटील, श्रीधर सरनाईक, वेदमूर्ती निखिल प्रसादे, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सिद्धनाथ चव्हाण, प्रभारी उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी, शिक्षकेतर प्रतिनिधी पूजा भोसले, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
रोज सकाळी सात ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी चार ते पाच प्रवचन, सायं पाच ते सहा हरिपाठ, सायं सहा ते आठ कीर्तन, रात्री नऊ ते अकरा संगीत भजन या प्रकारे साप्ताहिक कार्यक्रम राहतील. ह. भ. प. एकनाथ महाराज कोष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संपन्न होईल.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सचिव अजित वडगावकर यांनी कार्यक्रमाची रूपरेखा सांगत संस्थेत / विद्यालयात होणारे कार्यक्रम व भौतिक सुविधा पूर्ण होण्यास संत महात्म्यांचे आशीर्वाद फलद्रूप कसे होतात या विषयी आपले अनुभव विषद केले. त्यानंतर विश्वस्त प्रकाश काळे यांनी माऊलींच्या भूमीत राहत असताना येणारे अनुभव सर्वासमोर मांडले. शेवटी प. पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांनी ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला दिलेली ज्ञानज्योत गेली सातशे वर्ष तेवत आहे. तसेच उद्याच्या पंतप्रधान भेटीत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेने सन्मानात दिलेली माऊलींची मूर्ती पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना प्रसाद म्हणून देण्याचा मानस व्यक्त केला. तसेच माऊलींच्या भूमीत राहून माऊलींच्या नावाने ज्ञानदान करणाऱ्या संस्थेतील सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक हे भाग्यवान आहेत असा गौरव करण्यात आला.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ह. भ. प. चैतन्य महाराज कबीर यांची प्रवचन, हरिपाठ, ह. भ. प. पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन व गौरव महाराष्ट्राचा विजेता इंडियन आयडॉल टॉप-20 विजेता राहुल खरे व सहकारी औरंगाबाद यांचे संगीत भजन / गायन सेवा संपन्न होईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांसाठी थेट प्रक्षेपण भक्ती टी. व्ही. फेसबुक, यूट्यूब लिंक तसेच श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या यूट्यूब लिंक माध्यमाद्वारे पोहचविण्याचे काम संगणक समितीचे तंत्रस्नेही अध्यापक प्रकाश भागवत, सोमनाथ आल्हाट व त्यांची टीम, निलेश बागले, अजित मालुंजकर यांनी केले.

Previous articleकॉंग्रेसच्या वतीने घाटकोपर पारसीवाडी या ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Next articleघाटकोपर काजूटेकडी द्वारकामाई साई मंदिराचे सुशोभीकरण : अरविंद गीते