Home गोंदिया प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ

प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ

161

 

बिंबिसार शहारे
दखल न्युज भारत

गोंदिया,दि.१५/०८/२०२०:
मागील २-३ दिवस संततधार बरसलेल्या पावसामुळे जिल्हा पाणीदार झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत जलसाठा सातत्याने वाढत आहे. असे असतानाही जिल्ह्यात अद्याप अपेक्षेच्या तुलनेत पाऊस बरसलेला नसल्याने २५७ मीमी. पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची गरज आहे.
मान्सूनच्या सुरूवातीचा जून व जुलै महिना कोरडा-कोरडाच गेला. त्यामुळे जिल्ह्यात सुरूवातीपासून पावसाची तूट दिसून येत होती. मात्र मागील २-३ दिवस जिल्ह्यात सर्वदूर बरसलेल्या संततधार पावसामुळे काही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. शिवाय या संततधार पावसामुळे यंदा प्रथमच नदी-नाल्यांना पाणी आल्याचे दिसले. त्यामुळे जिल्हा पाणीदार झाला होता. या संततधार पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असतानाच शेतकरीही खूश झाला आहे. मात्र गुरूवारी (दि.१३) दुपारपासून पावसाने उघाड दिली आहे.
मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी (दि.१४) जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात ५२.३० टक्के, पुजारीटोला प्रकल्पात ६९.१८ टक्के, सिरपूर प्रकल्पात ४४.२४ टक्के तर कालीसरार प्रकल्पात ९.५० टक्के जलसाठ्याची नोंद घेण्यात आली. शिवाय प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ होत आहे. असे असताही मात्र अद्याप २५७ मीमी पावसाची तूट कायम आहे.
जिल्ह्यात १४ आॅगस्ट पर्यंत ८६९.६ सरासरी पाऊस अपेक्षित आहे. मात्र यंदा आतापर्यंत ६१२.८१ सरासरी पाऊस बरसलेला आहे.

Previous articleतालुक्यातील दिव्यांग बांधव यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणार- उज्वला बोढारे
Next article15 ऑगस्ट स्वतंत्र दिना निमित्त ग्रामपंचायत सोनसरी येथे झाडे लावा झाडे जगवा असा आगळा वेगळा कार्यक्रम