न्यायाचं पारडं सारखचं तोला !

0
98

 

©️-पंडित मोहिते-पाटील ✍️
(पत्रकार-लेखक)

नेपोटिझमचा बळी ठरलेला एक चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत टी.व्ही.चा पडदा आणि वृत्तपत्रांचे रकाने भरण्यात यशस्वी झालाय. हत्या की आत्महत्या यावर दिड-दोन महिने चर्चा विर्तक रंगवले जात आहेत. कुणाचाही जीव जाणं वाईटच. त्या सुशांतच्या आत्महत्येचं की कथित हत्येचं मी समर्थन करणार नाही. कारण प्रत्येकाला आपला जीव हवा असतो. पण सव्वाशे कोटींच्या देशात एक सुशांतच आत्महत्या करतो काय?

हजारो शेतकर्‍यांनी शेता-बांधावरच्या झाडांना लटकवून आपला जीवन प्रवास संपवला. त्यांची मुलं-बाळं उघड्यावर पडली. किती जणांनी मेणबत्ती मोर्चे काढले? किती जणांनी शासनाला जाब विचारला? किती निर्माते उपाशी झोपले?
विधवा पत्नी, अनाथ मुलं असहाय्य आई-वडील असा परिवार उघड्यावर पडला. चार्‍यावाचून ती मुकी जनावरे तडफडून मेली. बँक अधिकारी कर्जाच्या वसुलीसाठी दहाव्यालाच हजर. अशावेळी त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाने न्याय मागायचा कुणाकडे? सुशांत सिंह राजपूतकडे तर कोट्यावधी रुपये होते. त्याच्या प्रेम प्रकरणांमुळे अनेक जणींनी त्याला लुटलं. इथं शेतकर्‍याला निसर्ग आणि शासन व्यवस्था लुटते, त्याच्यासाठी कधी तरी अश्रू ढाळणार की नाही?

सुशांत सिंग राजपूत कोट्यावधी रुपये कमावून प्रेम-लफडी करून मानसिक दिवाळखोरीत जात आत्महत्या करत असेल तर त्याला एक न्याय व शेतकर्‍याला दुसरा न्याय हे कसं काय? म्हणजे हाय क्लास प्रोफाईल असेल तर ‘माणूस’? आणि दररोज १२-१४ तास काबाडकष्ट करून तुटलेल्या-फुटलेल्या घरात राहून आपल्या पत्नी-मुलांबाळांचं संगोपन करू पाहणारा ‘कचरा’? कुणीही यावे ‘डस्टबिन’ मध्ये टाकावे? या समाजव्यवस्थेचीच चीड येते. सध्या ‘कोरोना’चा महाभयंकर काळ सुरू आहे.

या चित्रपटसृष्टीलाच नव्हे तर संपूर्ण भारताला दोन वेळचं जेवू कोण घालतोय? शेतकरी! तो राबतोय म्हणून आपण खातोय! तो घरात बसला असता तर आपलाही ‘सुशांत’ झाला असता. त्याच्या पदरात काय पडतंय? टेम्पो भर शेतकर्‍याचा माल विकून जेवढा पैसा येईल, तेवढ्या पैशात ‘सुशांत’ रोज सकाळी नाश्ता करायचा, आणि आपल्या मैत्रीणींनाही खावू घालायचा.

टी.व्ही.मिडिया, प्रिंट मिडीयाने आपली नजर थोडी शेतकर्‍यांच्या शेताबांधाकडे वळवावी. विदारक चित्र आहे. पण यांना रस कशात तर टिआरपी कुठल्या आधारे मिळेल? देश महासत्ता बनण्याची स्वप्न बघतोय, देशातील ७० टक्के लोक शेतकरी आहेत. हजारो लोक रोज फाशी घेवून मरत आहेत. कलबुर्गी, पाणसरे, दाभोळकर, गौरी लंकेश, जज लोयिया हे देखील तितकीच प्रतिष्ठित लोक होती पण त्यांची चौकशी किंवा त्याची बातमी लाचार माध्यम दाखवत नाहीत.

सुशांत सारख्याचा बळी नेपोटिझम मुळे होत असेल, ती आत्महत्या असेल किंवा हत्या त्याचा शोध नक्की घ्या..पण बाकी गोष्टींना पण तितकेच न्यायाच्या पारड्यात तोला.. अखेर न्याय सर्वांनाच सारखा मिळावा, मग तो सुशांत असो, माझा कष्टकरी शेतकरी असो, किंवा निर्भिडपणे मत मांडणारे आणि व्यवस्था हलवून टाकणारे सामाजिक प्रतिष्ठीत व्यक्ती असोत.