आळंदीत मंदिर बंद असूनही महिलांचा मकरसंक्रात सण उत्साहात साजरा

आळंदी : आळंदीत शुक्रवारी मकर संक्रांतीचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सुवासिनी महिलांनी एकमेकींना वाण देऊन मकर संक्रांतीचा सण साजरा केला. कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने माऊलींचे समाधी मंदिर दर्शनासाठी मकरसंक्रांतीच्या दिवशी बंद ठेवण्यात आले होते.
मंदीर बंद असले तरी महाद्वार चौकात, इंद्रायणी नदीच्या घाटावर महिलांनी गर्दी केली होती.आळंदीसह गावोगावची मंदिर परिसरात महिलांच्या गर्दीने फुलून गेली होती.
दिवाळीनंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीचे महत्त्व आहे.त्यासाठी महिलांनी नवे कपडे व दागिन्यांची खरेदी केली होती.यावेळी महीलावर्गाचा ववसणे नावाचा पारंपरिक विधी पार पडला. ‘रामाचं सवळं सीतेला नेसवा…जनम जुगी ववसा…’ अशा ओव्या या वेळी म्हटल्या जात होत्या. सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत महिलांची गर्दी इंद्रायणी नदीच्या घाटावर कायम होती.एकमेकींना तीळगूळ देऊन गोडीगुलाबीने राहण्याचे वचन सर्व महिलांनी एकमेकींना दिले. महिलांनी सुगडांची पूजाही केली.
महाद्वार येथून माऊलींच्या संजीवनी समाधीचे झाल्यानंतर महिलांनी इंद्रायणी नदीच्या घाटावर फुगड्यांचा खेळ खेळून दिवस आनंदात घालवला.