आरमोरी तालुक्यातील मौजा रवी व मुलूर चक ही गावे आरमोरी नगरपरिषदेत समाविष्ट करा आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी

 

ऋषी सहारे
संपादक

आरमोरी-:- आरमोरी मतदार संघातील आरमोरी तालुक्यातील रवी व मुलूरचक ही गावे आरमोरी नगरपरिषदेत समाविष्ट करण्याची कारवाई करून मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात यावे अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ.कृष्णा गजबे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांचेकडे केली.
आ.गजबे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माझ्या मतदार संघातील गटग्रामपंचायत अरसोडा ता. आरमोरी अंतर्गत ग्रामपंचायतीचे मुख्यालय असलेल्या मौजा अरसोडा या गावाचा तत्कालीन नगरपंचायत आरमोरी मध्ये समावेश करून नगरपरिषद आरमोरी मध्ये रूपांतर करण्यात आले. सदर प्रक्रिया पार पाडताना ग्रामपंचायतीचे मुख्यालय असलेल्या मौजा अरसोडा गावाचा समावेश आरमोरी नगरपरिषदेत झाल्याने सदर ग्रामपंचायतिचे अस्तित्व संपुष्टात आले.त्यामुळे अरसोडा गटग्रामपंचायतीमधील मौजा रवी व मुलूरचक ही गावे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला जोडण्यात आलेली नसून नवीन ग्रामपंचायत स्थापणेकरिता आवश्यक नियमानुसार दोन्ही गावांची लोकसंख्या अपुरी असल्याने नवीन ग्रामपंचायतीची निर्मिती होऊ शकत नाही.त्यामुळे सदर गावातील ७०० ते ८०० नागरिकांना जन्म मृत्यूची नोंद,शासकीय कामासाठी आवश्यक दाखले मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित कामे करतांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रशासकीय दृष्ट्या रवी व मुलूरचक या गावांना स्थानिक स्वराज्य संस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.याकरीता दोन्ही गावातील नागरिकांनी सदर गावांचा नगरपरिषद आरमोरी येथे समावेश करण्याची मागणी केलेली असून नगरपरिषद आरमोरी सुद्धा सदर गावांचा समावेश करण्यात तयार असल्याचे कळते. तरी माझ्या मतदार संघातील मौजा रवी व मुलूरचक ही दोन्ही गावे आरमोरी नगरपरिषदेत समाविष्ट करण्याची कार्यवाही करावी व तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा अशी मागणीही आ.गजबे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली.