Home गोंदिया आरोग्य शिक्षण, शेती व रोजगारास प्राधान्य जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासन, प्रशासन...

आरोग्य शिक्षण, शेती व रोजगारास प्राधान्य जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासन, प्रशासन कटिबध्द—डॉ. विश्वजीत कदम पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

149

 

बिंबिसार शहारे
दखल न्युज भारत

भंडारा,दि. १५/०८/२०२०:
कोरोना साथरोगाने संपूर्ण जगाला विळखा घातला असून गेले काही महिने या रोगाशी आपला लढा सुरु आहे. कोविड-19 ला हरविण्यासोबतच अर्थचक्र व विकासाची गाडी रुळावर आणण्याचं आव्हान सुध्दा मोठं आहे. भंडारा जिल्हयात प्रशासन या दिशेने उत्कृष्ट काम करत आहे. आरोग्य शिक्षण, शेती व रोजगार या विषयाला प्राधान्य देण्यासोबतच नागरिकांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासन, प्रशासन कटिबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
स्वातंत्र्यदिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार सुनिल मेंढे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी मिनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी ध्वजारोहण होऊन पोलीसांनी पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
आरोग्य, शिक्षण शेती व रोजगार हा आमच्या सरकारच्या प्राधान्याचा विषय आहे. भंडारा जिल्हयाचा विचार करता राज्याच्या तुलनेत येथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी अद्यापही संकट पूर्णपणे टळलेले नाही. भंडारा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनामुळे जिल्हयात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा स्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे 222 खाटांचे डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. सदर हॉस्पिटलमध्ये 8 व्हँटिलेटर, सेंट्रल ऑक्सीजन आयसीयू बेडस् व इतर आवश्यक सेवा उपलब्ध आहेत. आवश्यकतेनुसार ही संख्या अधिक वाढविता येईल. वेगळे डायलेसिस सेंटर, गायनॅकॉलॉजी ओटी, नवजात शिशूंकरिता आवश्यक उपकरणे व प्रयोगशाळा आदीची व्यवस्था या ठिकाणी आहे. संशयित किंवा पॉझिटिव्ह रुग्णांसाठी विशेष रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत. 3 कोविड सॅम्पल कलेक्शन ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्रात फ्लू फिव्हर ओपीडी सुरु करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नसून काळजी मात्र घ्यावी. सुरक्षित अंतर ठेवूनच आपला वावर असावा,असे ते म्हणाले.
माझी कन्या भाग्यश्री योजनेत भंडारा जिल्हयात 1142 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. या योजनेत भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. पोषण अभियाना अंतर्गत जिल्हयात आधार सिडींगचे काम 95 टक्के झाले आहे. यामध्येही जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. तसेच अस्मिता योजनेचा लाभ देण्यात जिल्हा अव्वल आहे. महिला व बाल विकास विभागाच्या या यशाबद्दल पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले.
शेती विकास व शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदु असून महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून कर्जात असलेल्या जिल्हयातील 24 हजार 940 शेतकऱ्यांना 132.10 कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफी पासून एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी जिल्हयातील 81 हजार 989 शेतकऱ्यांना 405 कोटी 71 लाख रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चालू खरीप हंगाम 2019-20 मध्ये किमान आधारभूत धान खरेदी अंतर्गत जिल्हयात 32 लाख 10 हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. धान खरेदीसाठी 1 लाख 3 हजार 87 शेतकऱ्यांना 583 कोटी 3 लाख 80 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले तर 203 कोटी 87 हजाराचा बोनस वितरीत करण्यात आला असे ते म्हणाले. .
भंडारा जिल्हयामध्ये मागील पाच वर्षात 7 हजार 191 कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री हर घर बिजली सौभाग्य योजनेत जिल्हयातील 4 हजार 621 लाभार्थ्यांना नवीन वीज जोडणी देण्यात आली असून एकूण 147.30 लक्ष रुपयाचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी पोलीस विभागात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक यांचेकडून विशेष सेवापदक व सन्मानचिन्ह मिळालेल्या पोलीस उपनिरिक्षक अमरदीप खाडे, पोलीस हवालदार धमेंद्र बोरकर, प्रकाश शेंडे, दिलीप चुधरी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सेवापदक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून राम घोटेकर या शिंप्याने नि:शुल्क मास्क पोलीस विभागाला वाटप केल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला.
शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध, चित्रकला, भाषण, समुहगान स्पर्धेत कु. सायली शरणागते, आलोक काळे, दर्शना बावणकर, बुटी हायस्कुल खमारी यांचा तर दहावी व बारावीच्या परीक्षेत जिल्हयातून प्राविण्य प्राप्त विद्यार्थीनी आयुषी घावडे, किर्ती वाघाये, तोषिता गभणे, स्नेहा डोकरीमारे, पुजा अश्विन मेहता यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सर्वांसाठी घरे कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी गणेशपूर ग्रामपंचायत येथील अतिक्रमित लाभार्थी दुर्गा देशमुख, लक्ष्मीबाई सोनकुसरे, श्रीहरी काठाणे यांना पाल्कमंत्र्यांच्या हस्ते अभिनंदन पत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन स्मिता गालफाडे व मुकूद ठवकर यांनी केले. या कार्यक्रमास सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleमुख्याधिकारी च मनमानी कारभार कोरोना कोविड माहिती देण्यास करतो टाळाटाळ विनोद शर्मा यांचा आरोप
Next articleधनगर समाजचे ज्येष्ठ नेते श्री. रामदासजी दादा कोळेकर यांचा वाढदिवस