नियोजनशून्य कार्यपद्धतीमुळे शहराची वाताहात- ॲड. दीपक पटवर्धन

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी- नगर परिषदेच्या पाणी योजनेचे नवे पाईप टाकण्यासाठी संपूर्ण शहरातील रस्ते गेल्या वर्षी ऐन पावसाळ्यात खोदले गेले आणि संपूर्ण पावसाळा नागरिकांना चिखलमय, खड्डेमय मार्गांनी कष्टप्रद प्रवास करावा लागत आहे. पाऊस संपून दोन महिने झाले, नवीन वर्षाचे आठ दिवस झाले. मात्र शहरातील रस्ते पूर्णपणे उखडलेले, अनेक नागरिकांना या रस्त्यामुळे अपघात झाले. सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कार्यपद्धतीमुळेच रत्नागिरीकर पुरते हैराण झाले असून शहराची वाताहात झाल्याची आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केला आहे.
शहर भाजपाच्या बैठकीत ते बोलत होते. भूमीगत गटारे, गुळगुळीत रस्ते, कोटीच्या कोटी घोषणा मात्र प्रत्यक्षात काही नाही. रत्नागिरीमध्ये ठराविक प्रभागात उद्यानांची गर्दी मात्र दुसर्‍या भागात जुन्या उद्यानांची दुर्दशा पाहायला मिळते आहे. गेली पाच वर्षे ही रत्नागिरीकरांसाठी कष्टप्रद पाच वर्ष होती. अनागोंदी कारभार, मनमानी कारभार, अकार्यक्षम कारभार, नियोजनशून्य कारभार ताळमेळ नसलेली यंत्रणा ही गेल्या पाच वर्षातील वैशिष्ट्य होती. बहुमत, निरंकुश सत्ता, सातत्याने जनतेला दिलेला कौल या सर्वाचे हे फलित आहे, हे रत्नागिरीकर मनोमन समजून चुकला आहे. याचा उहापोह भाजपा शहर बैठकीत करण्यात आला. ते म्हणाले, खराब, खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांना मानेचे, पाठीचे विकार जडले. व्यापाऱ्यांच्या मालाची रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे सातत्याने नुकसान झाले. हे दुष्टचक्र अजूनही सुरू आहे. पाच वर्षात रस्त्यांच्या डागडुगीवर लाखो खर्च पडले असतील. पण रस्ते खड्डेमयच राहिले नव्हे रत्नागिरी शहरात असूनही अनेक मुख्य रस्ते अस्तित्वातच नाहीत. हे कार्यक्षम कामाचे प्रताप गेल्या पाच वर्षात अनुभवास आले. रस्ते उखडलेले, गटारांची स्थिती तीच, नालेसफाई, गटार सफाई या गोष्टीचा विसर पडलेला त्यामुळे पावसात शहरातील अनेक भागांचे रुपांतर जलमय तलाव, वहाळात झाले. अनेकांच्या घरात, दुकानात सातत्याने पाणी शिरून अपरिमित नुकसान झाले. मानसिक शारीरिक त्रास झाला तो वेगळा. याचे कारण नगर परिषदेच्या बहुमताने आलेल्या बेपर्वाईचा कारभार. ॲड. पटवर्धन यांनी सांगितले की, तारांगणाचे काम सुरू झाले. मात्र पाच वर्षे उलटूनही तारांगण अद्याप पूर्ण झाले नाही. आता म्हणे अमेरिकेतून मशिनरी येणार मग ती बसवून तारांगण सुरू होईल. नियोजनशून्यता दुसरी काय असू शकते ? गाजावाजा करून तारांगण उभारण्याच्या वल्गना झाल्या. प्रत्येक्षात पाच वर्ष होऊन काम अपूर्ण आहे. महिला रुग्णालय नव्याने उभारणी मात्र बांधकाम अपूर्ण, व्यवस्थेमध्ये गोंधळ, मराठी शाळांची अवस्था बिकट शाळा क्र. २ जमीनदोस्त करून दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला मात्र लोकमान्य टिळकांची शाळा नव्याने बांधली नाही. परटवणे येथे बांधून तयार असलेल्या पुलाचा प्रश्न गेल्या पाच वर्षात सुटू शकला नाही. प्रचंड वहातुक कोंडी होत असूनही बांधलेला पूल पूर्णत्वास नेता आला नाही.

*दखल न्यूज भारत.*