स्वतंत्र दिन विशेष लेख ‘भारतीय’ म्हणजे काय हो ?

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्ष पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...!

0
122

 

“दखल न्युज भारत”
©️-पंडित मोहिते-पाटील
(पत्रकार-लेखक)
दि.१५ ऑगस्ट, २०२०

भारत देशाचा फार जुना इतिहास आहे. देवदेवतांचा इतिहास, राजे-महाराजांचा इतिहास, अनेक क्रांतीकारकांचा इतिहास या देशाला लाभला आहे. जगाच्या पाठीवर केवळ हिंदुस्थानातच हजारो ग्रंथ आपल्याला पहायला, वाचायला मिळतील तेवढी प्रचंड ग्रंथसामुग्री भारतात आहे ती अन्य देशात कुठेही नाही. अनेक जातीपातीचे लोक या देशात गुण्यागोविंदाने जगतात तसे चित्र इतर देशात पहायला मिळत नाही.

हिंदुस्थान हा पवित्र देश आहे. सिंधू नदीच्या पलीकडे असणाऱ्या या देशाला हिंदुस्थान हे नाव पडले. अनेक इस्लामी राज्यकरत्यांनी या देशावर हुकुमत गाजविण्याचा प्रयत्न केला. येथील हिंदुंवर अन्याय केला तरीही हा हिंदू समाज तसाच टक्कर देत राहिला आणि आपल्या धर्माच रक्षण करीत राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक लढवय्या युगपुरुष या देशात जन्मला आणि त्यांनी तमाम जनतेचे आपल्या तलवारीच्या जोरावर रक्षण केले त्या महान अशा शिवरायांना आम्ही मानाचा मुजरा करतो.

इ.स.१७७० साली इंग्रज या देशात आले. मसाल्याच्या पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या इंग्रजांनी हळूहळू हिंदुस्थानात पाय रोवले. या देशातील लोक हे जातीपातीत भांडत आहेत हे इंग्रजांनी ओळखून घेतले आणि त्याचाच फायदा घेऊन त्यांनी “फोडा आणि राज्य करा” अशी निती वापरली आणि त्यांनी या देशातील नागरिकांना नोकरीचे, पैशाचे अमिषे दाखविले आणि हळूहळू हा देश गुलामगिरीच्या विळख्यात अडकत गेला.

अनेक क्रांतिकारकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळावे, इंग्रजांपासून हा देश मुक्त व्हावा म्हणून संघर्ष केला. काहींना जन्मठेप झाली तर काहींना फासावर लटकावले गेले. अनेक क्रांतीकारक आहेत त्यात मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लोकमान्य टिळक, आगरकर, चाफेकर बंधू, वि.दा.सावरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा ज्ञान अज्ञात लाखो क्रांतीकारकांच्या संघर्षाने हा देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आहे.

देश स्वातंत्र्य झाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी परंतु या देशातील अनेक मौल्यवान वस्तु इंग्रज आपल्या देशातून चोरुन गेले, त्यात अनेक सोने, चांदी, महाराजांची तलवार, हिरे, रत्ने अनेक अशा वस्तु आहेत ते कपटी इंग्रज बळकावून गेले. आपल्या देशात स्वातंत्र्यापासून फक्त राजकारणच चालत आले आहे. विकासाच्या नावाने या देशात सत्तर वर्षांनीही बोंब मारली जाते. अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत सुविधा अजूनही या देशात पुरविल्या जात नाहीत. लोकशाहीच्या नावाखाली येथील राज्यकर्ते भ्रष्टावादी बनले आहेत. गोरगरीब जनतेचे रक्त पित आहेत. आम जनतेचे या लोकांना काहीच देणेघेणे नाही.

इंग्रजांनी या देशावर दिडशे वर्षे राज्य केले परंतू त्या गोर्‍या लोकांचा राज्यकारभार हा पारदर्शक होता. आताचे कार्यकर्ते जनतेचे लुटारु आहेत. ७३ वर्षांनीही या देशातील जातीपातीतील भांडणे संपली नाहीत उलट दिवंसेदिवस जातीस्प्रेड वाढतच चालला आहे. जगात दोन नंबरला या देशाची लोकसंख्या आहे, परंतु इस्रायलसारखा ७०-८० लाख लोकसंख्येचा मामुली देश भारतापेक्षा शंभर पटीने पुढे गेला आहे. आज अमेरिकासुध्दा इस्रायलचे नाव काढल्यावर टरकते. नुसती लोकसंख्या नाही तर प्रगतीवर देश पुढे जात असतो. हे अनेक देशांनी दाखवून दिले आहे.

आम्हाला आमच्या देशावर खूप प्रेम आहे, परंतु धर्मवाद, जातीयवाद या देशात जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत हा देश म्हणेल असा पुढे जाऊच शकत नाही. येथील राज्यकर्ते आणि तेथील कायदा कानून या दोन्ही बाजू पारदर्शक असला पाहिजे. समान वागणूक या देशातील प्रत्येक नागरिकाला दिली गेली पाहिजे तरच कुठेतरी प्रगतीची एक किरण या देशात उगवेल.

या देशात जे देशद्रोही कृत्ये करतात त्यांना देशद्रोहाखाली फासावर लटकावले पाहिजे. देशात राहून देशाशी गद्दारी करणार्‍या हरामखोरांना ठोकून काढलं तरच हा देश भक्कमपणे उभा राहू शकतो. या देशातील जेवढे जेवढे आमदार, खासदार, मंत्री, विविध पक्षाचे नेते, पक्षाचे प्रमुख, विविध संघटना या सर्व लोकांमधे सर्व प्रथम हिंदुस्थानप्रति देशाभिमान असला पाहिजे, नुसत एक दिवस “भारत माता की जय” म्हणून काही होत नसतं तसा आदर देशाविषयी असला पाहिजे नाहीतर ममता बॅनर्जीसारख्या बाईप्रमाणे बांग्लादेशींचे लांघुलचालन कराल. ओवेसीसारखे भडकावू भाषण कराल, काश्मिरी फुटीरवादाला मदत कराल तर या देशाच भलं होऊ शकत नाही.

सामान्य माणूस हाच या देशाचा पाया आहे. सामान्य माणसात जेवढी ताकद आहे तेवढी पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीचीही नसेल कारण तुम्ही मत देता म्हणून ते निवडून येतात हे लक्षात ठेवा. म्हणून सामान्य माणसाने स्वतःला कधी कमजोर समजु नये. तुम्हीच खरे या देशाचे शिल्पकार आहात.

आपल्या देशातील राजकारण्यांनाही ‘भारतीय’ नकोच पाहिजेत. कारण भारतीयांना वेगळे केल्यास (वेगळ्या जातीत, वेगळ्या धर्मात) त्यांचा विजय सोपा होतो. पण ज्या दिवशी सगळ्यांनी ‘भारतीय’ म्हणून मतदान केले, तर तो दिवस या राजकारण्यांना सर्वात मोठा धडा शिकवेल आणि तेंव्हाच आपला हा भारत देश ख-या अर्थाने स्वातंत्र्य होईल आणि एक मजबूत व विकसित देश म्हणून जगासमोर येईल. म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकाला सांगू इच्छितो की, जात-पात व धर्माच्या नावावर आपापसात लढत बसत स्वतःसह देशालाही अधोगतीच्या दरीत न ढकलता आपले ‘भारतीय’चा खरा अर्थ समजून घ्या.