भंडारा जिल्हयात आढळले स्क्रब टायफस आजाराचे ८ रुग्ण

272

 

बिंबिसार शहारे
दखल न्युज भारत

भंडारा दि.१४/०८/२०२०:
जिल्हयात स्क्रब टायफस आजाराचे 8 रुग्ण आढळले असून भंडारा तालुक्यात करचखेडा, मोहाडी तालुक्यात नेरी, भोसा, शिवनी, डोंगरगाव, रोहा, मोहाडी प्रत्येकी एक व पवनी तालुक्यात पाथरी येथे एक रुग्ण आढळला आहे.
स्क्रब टायफस आजार विशिष्ट प्रकारच्या रिकेटशिया प्रकारच्या जिवाणूपासून पसरणारा आजार आहे. हा आजार अफगाणिस्थान, पाकीस्थान,रशिया, जपान, ब्रम्हदेश आणि भारतात आढळतो. भारतात हिमाचल प्रदेशमध्ये या आजाराचे रुग्ण प्रामुख्याने आढळतात.
स्क्रब टायफसचा प्रसार किटक चावल्यामुळे माणसास होतो. अधिशयन कालावधी 1 ते 3 आठवडे असतो. ज्या ठिकाणी किटक चावतो त्या जागी छोटासा अल्सर तयार होतो. त्याला ईशार असे म्हणतात. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, लिंफ, नोड सूजने, कोरडा खोकला रॅश उठणे या प्रकारची लक्षणे आढळतात. गुंतागुत न्युमोनिया, मेंदुज्वर सदृश्य लक्षणे, मायोकार्डायटिस इत्यादी गंभीर रुग्णांमध्ये मृत्युचे प्रमाण 30 टक्के आहे.
निदान- शिघ्र निदान चाचणी अथवा एलायझा मार्फत निदान केले जाते. वेल-फेलिक्स चाचणी देखील निदानासाठी वापरली जाते. प्रतिबंध व उपचार- स्क्रब टायफस आणि एकूणच रिकेटशियन तापामध्ये टेट्रायक्लिन, क्लोरॅमफेनिकॉल आणि डॉक्सीसायक्लिन ही औषधे परिणामकारक ठरतात. माईट नियंत्रणासाठी किटकनाशकाचा वापर करावा. झाडा झुडपात काम करतांना पूर्ण बाहयांचे पायघोळ कपडे वापरावे. कपडे, अंथरुन पाघरुणावर किटकनाशक औषधांचा वापर करावा. खुल्याजागी शौचास जाणे टाळावे. झाडाझुडपात काम करुन आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवून धुवावे. स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून आलेल्या रुग्णाच्या घराच्या भोवती आसणाऱ्या लहान मोठी खुरटी झाडे झुडपे काढून टाकावी. चिगार आढळून आलेल्या ठिकाणी जमीनीची नांगरणी तसेच जमीनीवरील सर्व पाला पाचोळा जाळून टाकण्यात यावा. पाळिव प्राणी व पोल्ट्री बर्डस असलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात याव्यात.
आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेली कार्यवाही -स्क्रब टायफस आजाराच्या मार्गदर्शक सूचना सर्व वैद्यकीय आधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना देण्यात आलेल्या आहेत. ज्या गावामध्ये स्क्रब टायफस आढळलेले आहेत. त्या गावामध्ये आरोग्य विभागामार्फत ताप रुग्ण सर्वेक्षण करुन गावात आढळणाऱ्या तापाच्या रुग्णाचे रक्तजल नमूने गोळा करण्यात येतात. संबंधित ग्रामपंचायत कार्यालयास किटकनाशक फवारणी करण्याबाबत सूचित करण्यात येते.
स्क्ब टायफस या आजाराचे निदान रक्त तपासणी मार्फत करण्यात येते. या आजारावर सर्व शासकीय रुग्णालयात आजारावर उपचाराकरीता औषधी उपलब्ध आहेत. परंतु या आजाराचे वेळीच उपचार घेण्याची गरज असते. त्यामुळे या आजाराची उपरोक्त लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुगणालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.