जादूटोण्याशी संबंधित तक्रारी व घटनांची संवेदनशिलतेने त्वरित नोंद घ्यावी – अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी….

200

प्रेम गावंडे
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

जादूटोण्याच्या संशयावरून नग्न धिंड काढून जिवे मारण्याच्या प्रयत्नाची भंडारा जिल्ह्यातील घटनेने पुरोगामी महाराष्ट्र हादरला असून अंधश्रद्ध मानसिकतेतून अशा घटना राज्यभर घडत आहेत, परंतु अश्या घटनांच्या तक्रारी बाबत पोलिस विभागाच्या योग्य हाताळणी आणि संवेदनशीलतेच्या अभावी अशा घटनांचे रूपांतर अमानविय-अघोरी पद्धतीने छळ होऊन जिवीत हानी होण्यामध्ये होतो तसेच जादूटोण्याच्या आरोप असलेल्या व्यक्ती व कुटुंबाला अनेक मानसिक, शारीरिक यातना, छळ आणि सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतो. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न निर्माण होतात.
चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा अशा अनेक घटना घडत असून सदर प्रकरणाची हाताळणी व तपास संवेदनशिलतेने तसेच जादूटोणाविरोधी कायद्याच्या दृष्टिकोनातून होत नसल्यामुळे पुढे प्रकरण गंभीर होऊन कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्‍न निर्माण होतात. तेव्हा पोलिस विभागाने अंधश्रद्धेशी संबंधित तक्रार व घटनांची त्वरित संवेदनशिलतेने नोंद घेऊन जादूटोणाविरोधी कायद्याच्या अनुषंगाने सदर घटनांची हाताळणी व तपास करावा ही मागणी अ. भा. निर्मूलन समिती जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, जिल्हा संघटक अनिल दहागांवकर, जिल्हा अध्यक्ष अॅड. गोविंद भेंडारकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप अडकिने, सह-सचिव अनिल लोनबोले, महिला संघटिका रजनी कार्लेकर, प्रसिद्धी प्रमुख निलेश पाझारे, सुजित खोजरे, प्रा. बालाजी दमकोंडवार, राजेश गावंडे, अविनाश आंबेकर, प्रा. संजय वासनिक, मंगेश नैताम यांनी केली आहे.