भाजपाचे तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन

 

वणी : परशुराम पोटे

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी वणी शहर व तालुका भाजपाच्या वतीने उद्या ३० नोव्हेंबर ला राज्य शासनाला जाग यावी यासाठी तहसिल कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे घेण्यात आलेल्या पत्र परिषदेतून आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार यांनी सांगितले आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाची बोन्ड सडली, कापूस पडला, सोयाबीन सडले. अशा प्रकारे अतोनात नुकसान झाले. वणी तालुक्यातील ९ मंडळांपैकी शिंदोला, पुनवट या मंडळात अतिवृष्टी होऊनही या मंडळातील शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांची अशी दयनीय स्थिती असतांनाच शासनाच्या विद्युत विभागाने थकीत कृषी पंप वीज धारक शेतकऱ्यांची विद्युत जोडणी खंडित करून शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक घेण्यापासून वंचित ठेवण्यात येत
आहे. शासनाची चाललेली दडपशाही अन्यायकारक आहे. या धोरणाला विरोध करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काच्या मागण्यांना लोकशाही मार्गाने आक्रोश आंदोलन करण्यात येणार होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणूका आणि लागलेली आचारसंहिता बघता दि.३० नोव्हेंबरला उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
अशी माहिती आ. बोदकुरवार यांनी विश्राम गृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली. याप्रसंगी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, भाजपचे जेष्ठ नेते संचालक दिनकर पावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर, तालुका अध्यक्ष गजानन विधाते, शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, नितीन वासेकर, विजय गारघाटे, शंकर बांदुरकर, संतोष डंभारे, राकेश बुग्गेवार उपस्थित होते.