तरूणाची गळफास घेवून आत्महत्या, कारण गुलदस्त्यात

 

वणीः- परशुराम पोटे

पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या प्रगती नगर येथील २७ वर्षीय तरूणाने घरातील पंख्याला चादरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारचे सुमारास उघडकीस आली आहे.
तालूक्यातील खांदला येथील गोपाल रमेश टोंगे २७ हा तरुण मोठ्या वडीलांकडे शहरातील प्रगतीनगर परिसरात मोठ्या आईसह रहात होता. तो वरोरा येथील खाजगी कंपनीत कामाला होता. गोपाल रविवारी त्याच्या खोलीत झोपायला गेला होता. परंतू सकाळी त्याची मोठी आई त्याला उठवावयास गेली. प्रसंगी तो उठला नाही. तो झोपेत असेल म्हणून तिने लक्ष घातले नाही. त्यानंतर दुपारी एक वाजताचे सुमारास परत उठवायला गेली असता खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने मोठी आई घाबरून गेली तिने शेजा-यांना बोलावले. त्यांनी खिडकीतून आत डोकावून बघीतले असता गोपालने घराच्या पंख्याला चादरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तिने लालगुडा येथील हेमंत ज्ञानोबा गौरकार यांना दिली. सोबतच पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणीच्या ग्रामिण रूग्णालयात पाठविला होता. गोपाल ने आत्महत्या का केली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.