मिर्‍या बंधार्‍यासाठी बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली मिर्‍यावासीय धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर

117

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी – शहराजवळील जाकीमिर्‍या, भाटीमिर्‍या समुद्र किनारपट्टीवर धूपप्रतिबंधक बंधारा दुरुस्तीसाठी जानेवारीमध्ये जिल्हा नियोजन मंडळाचा निधी मंजूर झाला. मात्र गेल्या सात महिन्यात तो न मिळाल्याने बंधार्‍याची दुरुस्ती रखडली आहे. पावसाळ्यात समुद्राच्या लाटांनी मिर्‍यावासीय जीव मुठीत धरून राहत आहेत. मंजूर निधी का मिळत नाही? हे विचारण्यासाठी माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली मिर्‍यावासीय जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवार दि. 14 ऑगस्टला सकाळी 11 वाजता कोरोनाविषयक सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून धडकणार आहेत. जिल्हा नियोजन अधिकार्‍यांनाही जाब विचारणार आहेत.
श्री. माने यांच्या नेतृत्वाखाली भाजप जिल्हा सरचिटणीस तथा मिऱ्या गावचे सुपुत्र राजेश सावंत, विकास सावंत, विजय सालीम, दीपक पाटील, महिला आघाडी अध्यक्ष तनया शिवलकर, ययाती शिवलकर, सुजाता माने, बाबा भुते, रुपेश सनगरे आदीसह सर्व ग्रामस्थ धडकणार आहेत.
जिल्हा प्रशासनाने मिर्‍या ग्रामस्थांची घोर फसवणूक केली आहे. जिल्हा नियोजनमधून जानेवारीत मंजुरी मिळाली. कोरोना महामारी मार्चमध्ये सुरू झाली. तत्पूर्वी पैसे मिळायला हवे होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. निधी तत्काळ मिळून काम सुरू व्हावे, याकरिता माजी आमदार बाळ माने यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्र पाठवले आहे. बंधारा दुरुस्तीसाठी 99.75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करावा म्हणून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने निधी मिळावा, अशा प्रकारचा प्रस्ताव सादर केला असल्याचे समजते.
मिर्‍या येथे सुमारे साडेतीन किमी लांबीचा टेट्रापॉड्स व ग्रोयनचा धूपप्रतिबंधक बंधारा करण्याबाबत 6 मार्च 2019 रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या विभागाने तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 189.67 कोटी रक्कमेला प्रशासकीय मान्यता देऊन प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक केली. परंतु हे काम दीर्घ मुदतीत पूर्ण होणारे आहे.पावसाळी हंगामात समुद्राच्या लाटांमुळे जाकीमिर्‍या, भाटीमिर्‍या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली 19 जानेवारी 2020 रोजी दुरुस्तीकरिता जिल्हा नियोजन मंडळामार्फत निधी देण्यात येईल, अशा सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पत्तन अभियंता विभागाने प्रस्ताव सादर केला. मात्र अद्यापही निधीची उपलब्धता झाली नसल्याने मिर्‍या येथे बंधार्‍याची तात्पुरती दुरुस्ती होऊ शकलेली नाही. यासंदर्भात पत्तन अभियंता विभागाने सविस्तर प्रस्ताव दाखल केला असल्याचे समजते. त्यामुळे या कामास प्रशासकीय मान्यता दिली असल्यामुळे तत्काळ काम होणे गरजेचे आहे. गेले 7 महिने जाकीमिर्‍या, भाटीमिर्‍या परिसरातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे तत्काळ निधीची उपलब्ध करून द्यावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

*दखल न्यूज भारत*