Home कोरोना  कोरोना विशेष लसीवर शंका

कोरोना विशेष लसीवर शंका

188

 

बिंबिसार शहारे

जगात कोरोनाग्रस्तांची संख्या दोन कोटींपेक्षा जास्त झाली आहे. कोरोनाने चार लाखांहून अधिक जणांचे बळी गेले आहेत. कोरोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीने जगाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे. कोरोनाचा विस्तार ज्या गतीने होत आहे, ते पाहता त्यावर सामाजिक अंतर भान, मुखपट्टी, चाचण्या आणि उपचार हेच आता पर्याय आहेत. त्याचबरोबर कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न होत आहे. विविध देशांतील १६० लसीवर संशोधन सुरू आहे. त्यांच्या मानवी चाचण्या सुरू झाल्या आहेत. चीन, अमेरिका, ब्रिटन या देशांनी कोणत्या देशाशी लस अगोदर येणार, याची जणू स्पर्धा लावली आहे. या सर्वांपासून दूर राहून रशियाने मात्र आपली लस बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या लसीबाबत शंका घेतली आहे, तरीही रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या आजारावर विकसित करण्यात आलेल्या लसीला मंजुरी दिली आहे.

कुठल्याही सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळवणारी, ही जगातील पहिली लस ठरली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या लसीची मंजुरी दिल्याची माहिती दिली. त्यांच्या मुलीलासुद्धा याच लसीचा डोस देण्यात आला असे पुतीन यांनी सांगितले. रशियाच्या ‘गामालिया इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी’ने ही लस विकसित केली आहे. दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत या लसीच्या मानवी चाचण्या झाल्या आहेत. लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी अंतिम फेजच्या क्लिनिकल चाचण्या सुरू राहणार असल्या, तरी सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, चीन, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या आधी रशियाला कोरोना विषाणूवरील लसीची निर्मिती करायची होती. त्यादृष्टीने रशियाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबरपासून या लसीची निर्मिती करण्याचा रशियाचा मानस आहे.

दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत या लसीच्या मानवी चाचण्या झाल्या आहेत; मात्र या लसीविरोधात आता काही प्रश्न उपस्थित होत आहेत. या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या इन्स्टिट्यूटने अद्याप दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांची संख्या जाहीर केलेली नाही. लस शोधताना हे दोन टप्पे अत्यंत महत्त्वाचे आहेत. शोधण्यात आलेली लस किती सुरक्षित आहे? हे या दोन टप्प्यांमध्ये तपासले जाते. जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे, की रशियाने जी लस शोधली आहे त्यासंबंधी पहिल्या टप्प्यात जी चाचणी झाली त्याचेच आकडे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने रशियाला विनंती केली आहे, की जे नियम लसीसाठी घालून देण्यात आले आहेत, ते पूर्ण केले पाहिजेत. रशियाने जी लस तयार केली आहे, त्याबाबत काहीशी चिंता वाटते आहे. ही लस फक्त असुरक्षितच नाही तर परिणाम न साधणारीही असू शकते असे म्हणत लॉरेन्स गॉस्टिन यांनीही चिंता व्यक्त केली आहे. गॉस्टिन हे जॉर्जटाउन विद्यापीठातले ‘ग्लोबल पब्लिक हेल्थ एक्स्पर्ट’ म्हणून कार्यरत आहेत. या सर्वांच्या आक्षेपांना पुतीन यांनी स्वतःच्या मुलीला डोस देऊन उत्तर दिले आहे.

Previous articleशेतकऱ्यांच्या समस्येवर शासनाने त्वरित ठोस निर्णय घ्यावा – आम आदमी पार्टी ची मागणी
Next articleअकोट येथे वंचितचे डफली बजाव आंदोलन