लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांनी फुलवला भाजीचा मळा

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी दि ११ :-
इथे विद्यार्थी वाचतच नाहीत तर घडतात सुद्धा – जग पुस्तकांचे ग्रंथालय व फिरते वाचनालयामार्फत सांडेलावगणसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भाजीचा मळा फुलविला आहे.
लॉकडाऊन नंतर सर्वसामान्य माणसाला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये अनेकांचे व्यवसाय, रोजगार ठप्प झालेत. यातून पोटाचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आला.
यात जग पुस्तकांचे ग्रंथालय व फिरत्या वाचनालयाच्या शाखा सांडेलावगणच्या विद्यार्थ्यांनी एक उपक्रम हाती घेतला. हे विद्यार्थी रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय रत्नागिरी येथे शिक्षण घेणाऱ्या राहुल बेनेरे हा द्वितीय वर्ष कला शाखेत तर धनंजय पाष्टे हा तृतीय वर्ष कला शाखेत शिकत आहे. हे जग पुस्तकांचे वाचनालयाचे वाचक असून सक्रिय कार्यकर्ते देखील आहेत.
लॉकडाऊन काळात काय करायचे? आपल्या पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा हा दोघांसमोरही प्रश्न होता. यावरून त्यांनी ग्रंथालय संचालक प्रसाद पाष्टे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत आपल्याकडील उपलब्ध साधने काय आहेत, तर त्यामध्ये पाणी आणि जागा या दोन्ही गोष्टी आहेत, त्यावरून भाजी लागवड करणे हा उपक्रम करायचे निश्चित करण्यात आले. यामध्ये जी जागा होती ती धनंजय पाष्टे यांच्या पडक्या घराची जागा वापरात नव्हती, तसेच नवीन घराजवळ सुद्धा थोड्या प्रमाणात जागा शिल्लक होती. त्यात विविध प्रकारचे सामान या भागात ठेवलेले होते, ते साफ करून घेतली. आणि त्यातच हे काम करण्याचे निश्चित झाले. आणि धनंजय चे वडील नथुराम पाष्टे यांनी आपली जागा देऊन सहकार्य केले.
भाजी लागवड करायची झाली तर त्याची लागवड कशी, कधी करायची याचा काहीच अनुभव गाठीशी नव्हता. यात सहकार्य लाभले ते वाटद खंडाळा येथील भाजी व्यावसायिक राकेश वरवटकर व हातखंबा झरेवाडी येथील कृषी विद्यार्थी प्रतीक कळंबटे याचे यांनी वेळोवेळो फोनवर व व्हिडीओ कॉल द्वारे संपूर्ण माहिती आणि काही प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले, त्यातून एक एक बाजू समजून घेत हा प्रकल्प उभा केलेला आहे.
यातून सेंद्रीय लागवड करणे निश्चित झाले. त्यासाठी लागणारी बियाणे, त्यानंतर सेंद्रिय खते, फवारणीची साधने असा काही प्रमाणात खर्च होता. ही लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला करायचे, असे ठरले त्यामुळे त्याअगोदरचा पंधरा दिवसांचा कालावधी इकडे तिकडे रोजगाराची कामे करून या दोघांनी एकत्रित केला. आणि याच खर्चातून समोरचा प्रश्न मिटवला.
यामध्ये दोन्ही ठिकणी ६ ते ७ गुंठ्यांत पडवळ, कारले, भोपळा, भेंडी, दोडके, गवार ही पिके घेत आहेत.त्याची फळनिर्मिती प्रक्रिया सुद्धा सुरू झाली, परिसरातील गावांत ही सेंद्रिय भाजी आम्ही विकणार आहोत. आणि लोकांना आरोग्यासाठी योग्य प्रकारची भाजी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.यामध्ये आम्हाला पंचायत समिती सदस्या साक्षी रावणांग सामाजिक कार्यकर्ते संतोष रावणांग यांचे मार्गदर्शन लाभले. अशी माहिती दिली सांडेलावगण गावचे ग्रामस्थ जयवंत बेनेरे, परशुराम पाष्टे, सुरेश पाष्टे, वसंत पाष्टे आणि वाचनालयाचे कार्यकर्ते विनायक गावडे, आकाश सावरकर, तुषार मांडवकर, प्रणाली बैकर, सोनाली कुरतडकर, साक्षी कुरतडकर, अनिकेत बेनेरे, राजेश पाष्टे, मिथुन पाष्टे, सुयश बेनेरे, रोशन बेनेरे यांनी या उपक्रमाला सहकार्य केले .
१) राहुल बेनेरे :
“जग पुस्तकांचे ग्रंथालय व फिरते वाचनालयाचे काम आम्ही सक्रियपणे गेली २ वर्षे पाहतो आहोत. यातून जी गावे आम्ही फिरलो त्यातून आम्हांला प्रामुख्याने जाणवलेली गोष्ट म्हणजे १० वी आणि १२ वी कोकणातील मुलांचे शिक्षण कमी होते आणि ते छोट्या छोट्या नोकऱ्यांकडे वळतात. त्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुले योग्य त्या उच्च शिक्षणाकडे वळू शकतात. सोबतच उद्योगांना सुद्धा ते प्राधान्य देऊ शकतात. आमचं हे वाचनालय यासाठी १० गावांमध्ये सक्रिय काम करीत आहे. आणि म्हणूनच आम्ही इथे फक्त वाचत नाही आहोत तर त्यातून घडतोय सुद्धा.”
२) धनंजय पाष्टे :
“वाचनालयाचा सक्रिय कार्यकर्ता काम करताना फक्त वाचन नाही, तर मिळालेल्या वाचनातून आणि अनुभवातून आपल्या पोटाची सोय कशी करता येईल. याचाही आम्ही सातत्याने विचार करीत आलो आणि त्यामुळे आज पूर्ण भारतात लॉकडाऊन असताना आम्ही आमच्या जीवावर आमच्या पोटाची व्यवस्था केली, असे म्हणणे आमच्यासाठी वावगे ठरणार नाही. आणि यातून वाचनालयाचे कामही पुढे नेत राहू.”
३) साक्षी रावणांग :- ( पंचायत समिती सदस्या )
“वाचन चळवळीकडून सध्याचा तरुण हा व्यावसायिक दृष्टिकोनही ठेवत आहे, आणि पुढे जाण्यास एक वेगळा आदर्श निर्माण करीत असल्याचे एक उत्तम उदाहरण म्हणायला हरकतच नाही.”

*दखल न्यूज भारत*