गडचिरोली जिल्हयात दुचाकीचे सर्वांत जास्त अपघात; हेल्मेटचा वापर आवश्यकच : जिल्हाधिकारी दीपक सिंगला यावर्षी 7 महिन्यात 63 पैकी 37 मृत्यू दुचाकीधारकांचे

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली : जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्हयातील अपघातांविषयी आढावा घेतला. यामध्ये जिल्हयात जानेवारी पासून आत्तापर्यंत झालेल्या 61 अपघातांविषयी माहिती घेतली. यामध्ये एकूण 63 वाहनाधारकांचा मृत्यू झाला पैकी सर्वांत जास्त 37 मृत्यू दुचाकिस्वारांचे आहेत. यामधील 37 सर्वच मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींनी हेलमेटचा वापर केला नव्हता. त्यामूळे जिल्हयात हेल्मेट वापराबाबत प्रक्रिया राबवा, जनजागृती करा अशा सूचना त्यांनी वाहतूक व पोलीस विभागाला दिल्या. तसेच एकूण 61 अपघातांमध्ये 34 अपघात दुचाकिस्वारांचे आहेत. त्यामूळे जिल्हयात हेल्मेट सक्तीबाबत प्रक्रियेला सुरूवात करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सुरूवातीला एक महिना वाहन धारकांची जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर संपुर्ण जिल्हयात हेल्मेट सक्ती लागू करण्याबाबत निर्णय घेणेत येईल असे जिल्हाधिकारी यांनी बैठकित सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या व्यतिरिक्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहित गर्ग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, विवेक मिश्रा कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम सुरेश साखरवाडे, पुनम गोरे वाहतूक शाखा गडचिरोली, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, डॉ. जयंत पर्वते शल्यचिकित्सक आरोग्य विभाग गडचिरोली, गोरख गायकवाड, होम डीवायएसपी पोलीस अधीक्षक कार्यालय उपस्थित होते.

जिल्ह्यात सर्वात जास्त आपघातही ग्रामीण रस्त्यांवरच झाले असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये 61 पैकी 25 राज्यमार्गावर, 8 राष्ट्रीय मार्गावर तर उर्वरीत 28 हे ग्रामीण भागात झाले आहेत. जास्त वेगाने दुचाकी चालविणे, अल्कोहोल सेवन करून गाडी चालविणे ही या अपघातांमधील प्रमुख कारणे असल्याचे निदर्शनास आले. यापुढे प्रत्येक अपघाताचे मायक्रो स्तरावर विश्लेषन करून अहवाल तयार करावे. जणेकरून त्यावरून ब्लॅक स्पॉट(वारंवार अपाघाताचे ठिकाण) ठरविण्यास मदत होईल. तसेच अपघातांच्या विश्लेषणावरून नेमक्या चूका कोणत्या आहेत व त्यावर उपाययोजना काय काय राबविता येतील याचा अभ्यास करता येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी स्वईच्छेने काम करणाऱ्यांना संधी : येत्या काळात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक गाव – शहरांमध्ये जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासाठी स्वच्छेने काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना संधी देण्यात येणार आहे. इच्छुकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोली येथे संपर्क साधावा असे संबंधित विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. चौकांमध्ये वाहन चालकांशी संवाद साधणे, पत्रके तयार करणे, बॅनर लावणे, होर्डींग्ज लावेणे अशा घटकांचा वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

शालेय स्तरावर रस्ता सुरक्षा विषयांवर युवकांना धडे : शालेय व महाविद्यालयिन स्तरावरील युवकांना दुचाकी शिकण्याचे व चालविण्याची आवड निर्माण होते. यामध्ये सुरूवातीलाच त्यांना वाहतूक नियम, कायदे लक्षात आणून दिले तर त्यांच्याकडून भविष्यात चूका होणार नाहित. यासाठी शालेयस्तरावर मुलांना वाहन चालवण्याबाबत घ्यावयाच्या खबरदार्‍या किंवा वाहन कायदे, नियम शालेय स्तरावर सांगावेत याबाबतच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडल्या.

रस्ते दुरूस्तीबाबत सूचना : जिल्हा परिषद रस्ते, बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग अशा विविध यंत्रणांना जिल्ह्यातील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश बैठकित जिल्हाधिकारी यांनी दिले. दिशा दर्शक फलक, सूचना फलक, धोक्याची ठिकाणे याबाबत माहिती देणारे फलक लावणे तसेच रस्ते दुरूस्ती करणे. आपघातांच्या ठिकाणांबाबत विश्लेषण करून त्यांवर उपाययोजना राबविणे. पावसामूळे किंवा इतर कारणाने रस्त्यांवर पडणारे खड्डे, रस्ता खचणे अशा अडचणी वेळेत सोडवून अपघातांचे प्रमाण कमी करणे याबाबत कामे करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

रस्ता सुरक्षा मार्गदर्शिकेचे विमोचन: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली यांनी रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका तयार केली आहे. याचे विमोचन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते या बैठकिदरम्यान करण्यात आले. सदर पुस्तिका महाविद्यालयीन युवकांसाठी महत्वाची मार्गदर्शिका ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी मत मांडले. शाळा सुरू झाल्यावर या पुस्तिकेच्या माध्यमातून जिल्हयातील युवकांना संदेश देण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.