आरमोरी येथील 4 पानठेलाधारकावर धडक कार्यवाही 4 हजाराचा दंड वसूल

215

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी

आरमोरी : खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस मनाई असतांना पानठेला सुरू करून खर्रा व इतर तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या शहरातील ४ पानठेला धारकांवर मुक्तीपथ अभियानाच्या पुढाकारातून नगर प्रशासनातर्फे ४ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पानठेल्यांवर बंदी घातली असून सुद्धा आरमोरी शहरात खुलेआम खर्रा विक्री सुरू असल्याचे निदर्शनात येत आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाय केले गेले आहेत. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हाभरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि साठवणुकीवर वर्षभरासाठी बंदी घातली आहे. यामुळे सर्वत्र पानठेले बंद असले तरी शहरात अन्य मार्गांनी गुप्तपणे या पदार्थांची विक्री होत आहे. तर काही व्यावसायिक शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत चाय विक्रीच्या नावाखाली तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत आहेत.
आरमोरी शहरातील बहुतांश पानठेले धारक इतर साहित्य विक्रीच्या आड खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थ व्यसनींना अधिक दरात उपलब्ध करून देत आहेत. याबाबतची माहिती मुक्तीपथ अभियानाने उजेडात आनताच नगर प्रशासनाने शहरातील एकूण २३ पानठेल्यांची चौकशी केली. दरम्यान चार पानठेल्यांमध्ये सिगारेट, खर्रा यांच्यासह तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. याप्रकरणी चारही पानठेला धारकांवर कारवाई करीत ४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे ठणकावून सांगण्यात आले. सदर कारवाई नप चे कर्मचारी लोकेश तिजारे व त्यांच्या पथकाने केली. यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक निलम हरिणखेडे उपस्थित होत्या.