लॉकडाऊन नियम पाळूनच होणार यावर्षीचा स्वातंत्र्य दिन साजरा सरकारची नियमावली जाहीर

0
232

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

मुंबई दि 11 ऑगस्ट-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमालाही लॉकडाऊन नियमावली बंधनकारक असणार आहे. शाळा , महाविद्यालये बंद असल्याने केवळ संबंधित संस्था वा व्यक्तीच्या पुढाकाराने कमी माणसांतच हा कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली. राज्य सरकारने परिपत्रक काढून यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आहे. यावर्षी भारत 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असून दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम साजरा करण्यावर यंदा मर्यादा आहेत. वस्तुस्थिती व सावधगिरीचा उपाय म्हणून हे निर्देश देण्यात आल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी परिपत्रक काढून काही सूचना केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मुंबईतील मंत्रालयात सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. तर, राज्यपालांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण पार पडेल. राज्यातील इतर जिल्ह्यात व विभागीय क्षेत्रात पालकमंत्र्याच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. राज्यभर एकाचवेळी म्हणजे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात यावा, असे सांगण्यात आले आहे. तसेच, यंदाच्या ध्वजारोहण सोहळ्याला शहीद जवानांच्या पत्नी, आई-वडिल, कोरोना योद्धा आणि कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना आमंत्रित करावे, असेही सूचविण्यात आले आहे. कोरोनामुळे सामाजिक अंतर ठेऊन, लॉकडाऊनची नियमावली पाळून साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमातून सोशल मीडियाद्वारे आत्मनिर्भर भारत या घोषणेचा प्रसार करावा, असेही सांगण्यात आले आहे. नागरिकांनी सोशल मीडिया व डिजिटल मीडियातून ध्वजारोहण सोहळा साजरा करतान देशभक्तीपर गीते, वेबिनार यांचे आयोजन करावे. त्यासोबतच, घरातील बाल्कनीत आणि गच्चीवर जाऊन हाती तिरंगा फडकवावा, असेही आवाहन शासनाकडून करण्यात आले.