मुंबई महापालिका शारीरिक शिक्षण शिक्षक रवीकांत पिंपळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

मुंबई, दि. ११ : मुंबई महापालिका शिक्षण विभाग – सांताक्रुझ एच (पूर्व) विभागातील रवीकांत किसन पिंपळे यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. शारीरिक शिक्षण विभाग क्र. ६ मधील नारियलवाडी मनपा हिंदी शाळेत ते कार्यरत होते. पालघर तालुक्यातील पाम हे त्यांचे गाव होते.

काल त्यांच्या मामांचे निधन झाले. मामाला खांदा देताना रवीकांतच्या अचानक छातीत दुखु लागले. तातडीने त्यांना बोईसर येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मुंबईला घेऊन जाण्यास सांगितले. तयारी करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने मुंबई महापालिका शिक्षण विभाग व शारीरिक शिक्षण उपविभागात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पालघर तालुक्यातील पाम हे त्यांचे गाव होते. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. नेहमी दिलेलं काम उत्साहाने करत होते. विभागातील सर्व उपक्रमात नेहमी पुढाकार असायचा. सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी अग्रेसर होते. संकटकाळात मदतीला धावून जाणे हे त्यांच्यात उपजत होते. लेझीम शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. विभागात लेझीमचा संघ उत्कृष्ट असायचा. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ होता. कामात त्यांचा हात कोणी धरु शकत नव्हते. विभागातील इतर शिक्षकांना बरोबर घेऊन चालणारे ते हाडाचे शिक्षक होते. त्यांच्या अचानक जाणाऱ्या या घटनेवर अजुनही सहकाऱ्यांचा विश्वास बसत नाही.

त्यांच्या पाठीमागे पत्नी रेश्मा, मुलगा यश व मुलगी उर्वी असा परिवार आहे.