नक्षलविरोधी अभियान दरम्यान गडचिरोली पोलिसांनी टिपागड दलम डिव्हीसीएम यशवंत बोगा याला पत्नी सुमित्रासह केली अटक – दोघांचाही विविध नक्षल गुन्ह्यांमध्ये सहभाग – पोलिस महासंचालकांनी केले गडचिरोली पोलिस दलाचे अभिनंदन

0
300

 

जगदीश वेन्नम /हर्ष साखरे

गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानादरम्यान आज १० ऑगस्ट रोजी गडचिरोली पोलिस दलास मोठे यश मिळाले असून जहाल वरिष्ठ नक्षली व टिपागड दलमचा डिव्हीसीएम यशवंत उर्फ दयाराम अंकलु बोगा (३५) याला त्याची पत्नी व जहाल नक्षली टिपागड दलम सदस्य शारदा उर्फ सुमित्रा पितुराम नैताम (३२) हिच्यासह अटक करण्यात आली आहे. यामुळे नक्षल दलमचे चांगलेच कंबरडे मोडले असून पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी गडचिरोली पोलिस दलाचे अभिनंदन केले आहे.
जहाल नक्षली यशवंत बोगा हा २००९ मध्ये टिपागड दलममध्ये भरती होउन नक्षलमध्ये दाखल झाला होता. सद्या तो टिपागड दलमचा डिव्हीसीएम म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर गडचिरोली पोलिस दलाच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये ७८ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये सहा पोलिसांसह १८ खुनाच्या तर १० जाळपोळीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. हत्तीगोटा, मरकेगाव यासह २०१९ मध्ये दादापूर येथे वाहन जाळपोळीच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. १ मे २०१९ रोजी जांभुळखेडा येथे घडवून आणलेल्या भुसुरूंग स्फोटात त्याचा मुख्य सहभाग होता. त्याच्यावर एकूण ३५ पोलिस – नक्षली चकमकीत सहभागी असल्याची नोंद आहे. शासनाने त्याच्यावर १६ लाखांचे पारितोषिक जाहीर केले होते. तर त्याची पत्नी शारदा नैताम हिच्यावर गडचिरोली पोलिस दलाच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये ४७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने तिच्यावर एकूण २ लाख रूपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.