आजोबाने नातवाला तंबाखू न दिल्यामुळे नातवाने केला आजोबाचा खून ; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा आणि 5 हजार रुपये दंड जिल्हा व सत्र न्यायाधिश बी.एम. पाटील यांचा निकाल

227

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत

गडचिरोली: आजोबाला तंबाखू मागितले परंतु आजोबाने तंबाखू नसल्याने दिले नाही. या कारणावरून आजोबाचा कुऱ्हाडीने वार करून खून करणाऱ्या नातवास जिल्हा व सत्र न्यायाधिश ३ बी.एम. पाटील यांनी जन्मठेेपेची शिक्षा आणि ५ हजार रूपये दंड ठोठावला आहे.
सुभाष मलय्या तलांडी (२७) रा. सोमनपल्ली ता. सिरोंचा असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
१८ जून २०१८ रोजी रात्री १० वाजता फिर्यादी सुनिता मलय्या तलांडी ही घरी असताना मृतक आजोबा राजम बुच्चम तलांडी हे घरात खाटेवर बसून होते. यावेळी फिर्यादीचा भाउ सुभाष मलय्या तलांडी याने आजोबास तंबाखू मागितला. यावेळी आजोबाने आपल्याजवळ तंबाखू नाही असे सांगितले. याचा राग मनात धरून आरोपी सुभाष याने घरातील कुऱ्हाड आणली. यानंतर आजोबाच्या डोक्यावर मागील बाजूस मारून जिवानिशी ठार मारले. आरोपीच्या वहिनीच्या तोंडी रिपोर्टवरून आरोपी सुभाष याच्याविरूध्द आसरअल्ली पोलिस ठाण्यात कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर दराडे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार तर्फे फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण नोंदवून सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत आज १० ऑगस्ट रोजी आरोपीस कलम ३०२ अन्वये जन्मठेप व ५ हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास ३ महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सदर न्यायनिवाडा व्हिडीओ काॅन्फरन्सींगद्वारे करण्यात आला. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एन.एम. भांडेकर यांनी काम पाहिले.